सतीश सावंतांनी अद्ययावत रुग्णालयाची सुविधा का उपलब्ध केली नाही, प्रमोद जठार यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 09:31 PM2018-01-04T21:31:52+5:302018-01-04T21:45:33+5:30
गोवा मेडिकल कॉलेज मध्ये उपचारासाठी सिंधुदूर्गातून जाणाऱ्या रुग्णांकडून शुल्क आकारले जात असल्याचे सांगून आमच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत टिका करीत आहेत. मात्र , त्यांनी 26 वर्षे सत्तेचा लाभ घेतला. तेव्हा सिंधुदूर्गातील जनतेला अद्ययावत रुग्णालयाची सुविधा का उपलब्ध करून दिली नाही? याचे उत्तर आमच्यावर टिका करण्यापूर्वी द्यावे.असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी लगावला आहे.
कणकवली : गोवा मेडिकल कॉलेज मध्ये उपचारासाठी सिंधुदूर्गातून जाणाऱ्या रुग्णांकडून शुल्क आकारले जात असल्याचे सांगून आमच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत टिका करीत आहेत. मात्र , त्यांनी 26 वर्षे सत्तेचा लाभ घेतला. तेव्हा सिंधुदूर्गातील जनतेला अद्ययावत रुग्णालयाची सुविधा का उपलब्ध करून दिली नाही? याचे उत्तर आमच्यावर टिका करण्यापूर्वी द्यावे.असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी लगावला आहे.
येथील भाजप संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा नेते संदेश पारकर, भाजप तालुका सरचिटणीस बबलू सावंत उपस्थित होते.
यावेळी प्रमोद जठार म्हणाले, गोवा मेडिकल कॉलेज मध्ये उपचारासाठी सिंधुदूर्गातून जाणाऱ्या रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्काविषयी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. सिंधुदुर्गातून तिथे उपचारासाठी जाणारे 95 टक्के रुग्ण हे गंभीर असतात. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाहीं. तर इतर किरकोळ आजारासाठी उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून फक्त नोंदणी शुल्क आकारले जात असल्याचे आपल्याला त्यांनी सांगितले आहे.
तसेच या किरकोळ आजारावर उपचार करण्यासाठी जाणाऱ्या रुग्णांकडून जर अतिरिक्त शुल्क आकारले जात असेल तर आपल्याकड़े त्याबाबत तक्रार करा. त्यावर निश्चितच निर्णय घेतला जाईल .तसेच अतिरिक्त शुल्क परत केले जाईल असे मंत्रीळ विश्वजीत राणे यांनी सांगितले आहे. त्यामुळे सिंधुदूर्गातील रुग्णांनी भयभीत होऊ नये. गोव्यातील उपचारा बाबत काही तक्रारी असतील तर आपल्याशी संपर्क साधावा.
त्याचबरोबर सिंधुदुर्गातून गोमॅकोत जाणाऱ्या रुग्णांसाठी मदत कक्ष सुरु करावा .त्यासाठी आम्ही सहकार्य करु असेही मंत्री राणे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपण जिल्हा रुग्णालयाला त्यासाठी विनती केली आहे.
सतीश सावंत यांनी याविषयावरुन टिका करण्यापूर्वी आपण सत्तेत असताना सिंधुदूर्गातील रुग्णांचा उचाराचा प्रश्न का सोडवू शकलो नाही याचा प्रथम विचार करावा. भाजप शासनाच्यावतीने सिंधुदुर्गात शासकीय मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे येथील रुग्णाना चांगले उपचार मिळतील.
कणकवलीतील महामार्ग चौपदरिकरण प्रकल्पबाधित उपोषण करणार आहेत. मात्र, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या शिक्षण मंत्री विनोद तावड़े व ग्रामविकास मंत्री पंकजा मूंडे यांचे लक्ष या समस्येकडे वेधले आहे. जागेचा रेडिरेकनर दर वाढवून मिळाला आहे. आता बांधकामासाठी रेडिरेकनर दर वाढवून मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच ग्रामीण भागा प्रमाणे दोन गुणांक मिळावा असाही प्रयत्न आहे. याविषयाबद्दल 5 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजता महसुल मंत्री चन्द्रकांत पाटील यांच्यासोबत मुंबई येथे बैठक घेण्यात येणार आहे.या बैठकीत उपस्थित राहुन आपण समस्या मांडणार आहे. जोपर्यन्त प्रकल्प बाधितांचे सर्व प्रश्न सूटत नाहीत तोपर्यन्त महामार्गाचे काम सुरु करु देणार नाही.असे प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदूर्गातील आरोग्यव्यवस्थेला त्यावेळचे सत्ताधारीच जबाबदार!
माजी मुख्यमंत्री असलेले नारायण राणे 26 वर्षे सत्तेत होते. त्यावेळी त्यानी सिंधुदुर्गात चांगली आरोग्य व्यवस्था का उभारली नाही. येथील जनतेला गोव्यात किंवा इतर जिल्ह्यात उपचारासाठी का जावे लागते ? याचा त्यांच्या समर्थकानी विचार करावा. सिंधुदूर्गातील भाजपचा आता आमदार किंवा मंत्री असता तर हा प्रश्न निश्चितच सुटला असता. सिंधुदूर्गातील सध्याच्या आरोग्य व्यवस्थेला त्यावेळचे सत्ताधारीच जबाबदार आहेत.असे संदेश पारकर यांनी यावेळी सांगितले.