जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना सतीश सावंत यांनी दिला सन्मान : दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 07:39 PM2021-07-02T19:39:57+5:302021-07-02T19:42:19+5:30
Banking Sector Deepk kesrkar SIndhudurg : राजकारणापलीकडे जाऊन कसे काम करावे हे सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर राहून दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार क्षेत्रात चांगले काम करतानाच शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी गुरुवारी बँकेच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
ओरोस : राजकारणापलीकडे जाऊन कसे काम करावे हे सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर राहून दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार क्षेत्रात चांगले काम करतानाच शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी गुरुवारी बँकेच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्यावतीने कोरोनामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना आर्थिक मदत, जास्त भातविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान कार्यक्रम जिल्हा बँकेच्या सभागृहात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आम. वैभव नाईक, उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते. सुरुवातीला बँकेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गेल्या खरीप हंगामात जास्तीत जास्त भातविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शाल, श्रीफळ, जांभूळ झाड देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सतीश सावंत म्हणाले की, बँकेचे चांगले काम आणि चांगल्या योजना यामुळेच बँकेचा एनपीए शून्य टक्के राहण्यास मदत झाली आहे. बँकेच्या सभासदांना १०.६० टक्के लाभांश देणारी राज्यातील एकमेव बँक आहे. बँकेने यांत्रिकीकरणासाठी मदत केल्यानेच जिल्ह्यात भात शेतीक्षेत्र व उत्पादन वाढले आहे. ही बँक शेतकऱ्यांची असल्याने शेतकऱ्यांसाठी आणखी काही करता येईल का, यासाठी आपले प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार वैभव नाईक म्हणाले की, शेतकऱ्यांना फायदा होईल हे बँकेचे उद्दिष्ट आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळेच या बँकेने अनेक पुरस्कार मिळविले आहेत. छोट्या योजनांसाठी कर्ज पुरवठा बँकेने केल्याने यांत्रिकीकरण वाढून शेतकरी समृध्द झाला आहे. शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम बँक करीत असून यापुढेही हे कार्य सुरू राहील.
देर आये दुरुस्त आये
चांदा ते बांदा योजना चांगली होती. मात्र या योजनेची राष्ट्रीयीकृत बँकांनी योग्य प्रकारे अंमलबजावणी केली नाही. त्यावेळी जिल्हा बँक ही योजना आपल्याकडे मागत होती. मात्र त्यावेळी सतीश सावंत हे दुसऱ्या पक्षात होते. परंतु आता ते आमच्या पक्षात आहेत. चांदा ते बांदाऐवजी सिंधुरत्न योजना सुरू झाली आहे. देर आये दुरुस्त आये असे सांगत सिंधुरत्न योजनेत जिल्हा बँकेच्या माध्यमातून चांगले काम करण्याची आमदार दीपक केसरकर यांनी ग्वाही दिली.