नारायण राणेंना 'स्वाभिमानी धक्का', सिंधुदुर्गातील निकटवर्तीयाने साथ सोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 08:56 PM2019-09-30T20:56:58+5:302019-09-30T20:58:57+5:30
आमदार नितेश राणे यांनी गेल्या पाच वर्षात कणकवली विधानसभा मतदारसंघात आपल्याला विश्वासात घेतलेले नाही.
कणकवली : नारायण राणे यांचे खंदे समर्थक आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्या कलमठ येथील निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. सावंत यांच्या स्वाभिमानी धक्क्यामुळे राणेंना मोठा धक्का असल्याचं मानलं जातयं. नारायण राणे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
आमदार नितेश राणे यांनी गेल्या पाच वर्षात कणकवली विधानसभा मतदारसंघात आपल्याला विश्वासात घेतलेले नाही. पक्षाचे नेते नारायण राणे यांनी सुद्धा गेल्या आठ दिवसात माझ्यावर अविश्वास दाखवला तसेच आपण भाजपमधून निवडणूक लढणार असून मला कुडाळ मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढण्याचा सल्ला दिल्याने मी नाराज झालो. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सदस्य पदाचा आणि प्रवक्तेपदाचा आज राजीनामा देत आहे असे सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी गेली 24 वर्षे राजकारणात आहे. त्यांच्यासोबत प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला. ज्या पदाची जबाबदारी दिली ती चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. पण मी कोणत्याही पक्षात जाणार नव्हतो. आमदारकीबाबत माझा कोणताही विचार नव्हता, तरीही माझ्याबाबत वेगवेगळ्या चर्चा घडविण्यात आल्या. मी मातोश्रीवर गेलो असे सांगण्यात आले. मी कणकवलीत असतानाही माझ्याबाबत वेगवेगळ्या वावड्या उठविण्यात आल्या. माणसे पाठवून खात्री करण्यात आली. यामुळे जर पक्षनेतृत्वाचा विश्वास आपल्यावर नसेल तर त्या पक्षाचे काम करणे अवघड आहे. त्यामुळे यापुढे शेती, सहकार आणि सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे स्वप्न घेऊन काम करण्याची आपली इच्छा आहे. माझे विचार ज्या पक्षाला पटतील त्या पक्षासोबत मी जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नेमकं कोणत्या पक्षात सावंत जाणार हे कोडं अद्याप उलघडलं नाही, आता सावंत कोणता झेंडा हाती घेणार याचीच कणकवलीत चर्चा सुरू आहे.