‘रत्नागिरी गॅस’ला शनिवारचा मुहूर्त
By admin | Published: November 18, 2015 11:51 PM2015-11-18T23:51:38+5:302015-11-19T00:42:51+5:30
पहिल्या टप्प्यात ३०० मेगावॅट वीज निर्मिती : सर्व वीज रेल्वेला देणार
संकेत गोयथळे ल्ल गुहागर
रत्नागिरी गॅस प्रकल्पातून रेल्वेसाठी ५०० मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक सर्व मंजुरी रेल्वेने मिळवल्या असून तब्बल दोन वर्षे वीज निर्मिती ठप्प असलेल्या या प्रकल्पातून शनिवार, २१ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यातील ३०० मेगावॅट वीज निर्मितीची सुरुवात होणार आहे.
रत्नागिरी गॅस विद्युत प्रकल्पातील वीज घेण्यासाठी आवश्यक सेंट्रल इलेक्ट्रीकल रेग्युलेट्री अॅथॉरिटीचा (सीईआरसी) परवाना काही दिवसांपूर्वी मिळाला होता. मात्र महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेट्री कमिशनची मंजुरी मिळणे बाकी होती. ही मंजुरी २१ नोव्हेंबरला मिळणार असून, याच दिवशी ८ वाजल्यानंतर ३०० मेगावॅट वीज निर्मिती सुरू केली जाणार आहे. ही वीज महाराष्ट्रातील रेल्वेसाठी दिली जाणार आहे.
रत्नागिरी गॅस प्रकल्पातून डिसेंबर २०१३ पासून वीज निर्मिती बंद ठेवण्यात आली आहे. रिलायन्सच्या गोदावरी प्रकल्पातून गॅस पुरवठा बंद झाल्याने व अन्य ठिकाणाहून महागड्या दराने मिळणाऱ्या गॅसवर निर्माण होणारी वीज महाग होत होती. अशा दुहेरी संकटात प्रकल्प सापडला होता. सत्ता बदलानंतर प्रकल्प सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली होतील, हे अपेक्षित होते. अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प सुरू करण्यास अनेक अडचणी असल्याचे जाहीर केल्यानंतर हा प्रकल्प बंद पडतो की काय, असे वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी प्रकल्प सुरू होणार असल्याची घोषणा केली. काही दिवसांनी २ नोव्हेंबरचा मुहूर्तही घोषित करण्यात आला. मात्र वीज घेण्यासाठी आवश्यक परवानगी रेल्वेला मिळवण्यासाठी वेळ झाल्याने हा मुहूर्त टळला. यादरम्यान प्रकल्पाच्या तीन टप्प्यातून १९५० पैकी ५०० मेगावॅट वीज रेल्वे घेणार असल्याने संपूर्ण सज्जता महिनाभरापासूनच ठेवली आहे. टप्पा एक हाही सज्ज ठेवला आहे. टप्पा २ व ३ची क्षमता प्रत्यक्षात एक हजार मेगावॅटची आहे.
दुसऱ्या टप्प्यात : २०० मेगावॅटने वीज वाढवणार
४रेल्वेकरिता ५०० मेगावॅट वीज घेतली जाणार असून, यामध्ये राज्य शासनाकडून आवश्यक परवानगी
पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील ३०० मेगावॅट वीज निर्मिती सुरू होणार आहे.
४तसेच झारखंड व पश्चिम बंगालसाठी दोनशे मेगावॅट वीज दिली जाणार आहे.
४यासाठी आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वीज निर्मितीत आणखी २०० मेगावॅटने वाढवली जाणार आहे.