Sindhudurg: सावडाव धबधबा पर्यटकांना घालतोय साद, परजिल्ह्यातील पर्यटक जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 04:07 PM2023-07-10T16:07:17+5:302023-07-10T16:07:56+5:30
आंबोली नतंर वर्षा पर्यटनासाठी चांगला धबधबा
निकेत पावसकर
तळेरे : यावर्षी पावसाचे आगमन लांबल्याने अनेक धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले नव्हते. मात्र, जून अखेरीस पावसाने चांगला जोर धरला. मुंबई गोवा महामार्गावर जवळच असलेला सावडाव धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आणि सुट्टीत पर्यटक या धबधब्याकडे मोठ्या संख्येने येऊ लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अल्पावधीत महाराष्ट्रासह परराज्यात प्रसिद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील निसर्गरम्य सावडाव धबधबा प्रवाहित होण्याची वाट पाहत असतात. यावर्षी पुन्हा एकदा वर्षा पर्यटन सुरू झाले असून जिल्ह्यासह राज्य व परराज्यातील पर्यटकांची उच्चांकी गर्दी आता दिसू लागली.
कणकवली पासून अवघ्या 16 किमी अंतरावर तर मुंबई गोवा महामार्गावरून 6 किमी अंतरावर असलेल्या सावडाव धबधबा अनेकांना आकर्षित करतो. या धबधब्या जवळ मोकळी प्रशस्त जागा आहे. शिवाय या धबधब्यात आंघोळ करताना धोकादायक काहीही नाहीय.
यावर्षी मान्सून उशिया सक्रिय झाला तरी सावडाव धबधबा परिसरात दमदार पडणा-या पाऊसामुळे धबधबा प्रवाहित झाला आहे. वर्षा पर्यटनांसाठी सावडावकडे येत्या शनिवार, रविवार व विकेंडला वर्षा पर्यटकांची पाऊले वळू लागतात. हिरवीगर्द झाडी, हिरव्या गार निसर्गरम्य वातावरणातून खळखळ वाहणारा धबधबा पर्यटकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळतो.
जिल्हातील आंबोली नतंर वर्षा पर्यटनासाठी चांगला धबधबा असल्यामुळे जिल्हयासह राज्यातून व इतर राज्यातील अनेक पर्यटक सावडावला पसंती देतात. त्यामुळे दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.
निसर्गरम्य वातावरण
डोंगर पठारावरुन पसरट कड्यावरुन खाली कोसळणारा गर्द हिरव्या झाडा झुडपांतला आनंदाचं उधाणच आलेला सावडाव धबधबा कोसळून लागला असल्याने धबधब्याखाली अनेक पर्यटक आंघोळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. यावर्षी जून अखेरपासून ते सप्टेंबर काळात सावडाव धबधब्यावर पर्यटकांची संख्या दररोज वाढणार असून रविवार व सुटटीच्या दिवसांसह अन्य दिवशीही पर्यटक वर्षा पर्यटनासाठी गर्दी दरवर्षी वाढतीच आहे.