पाळयेतील जंगलात सांबराची शिकार
By Admin | Published: February 2, 2016 09:25 PM2016-02-02T21:25:29+5:302016-02-02T21:25:29+5:30
वीजेचा धक्का लावण्याचा प्रकार : ग्रामस्थांना पाहताच शिकाऱ्यांचा पोबारा
दोडामार्ग : पाळये साळीचे टेंब येथील जंगलात सांबराची शिकार झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. वीजेचा धक्का देऊन ही शिकार करण्यात आली. मृत सांबराचे मांस कापताना गावातीलच काही ग्रामस्थ त्याठिकाणी पोहोचताच शिकाऱ्यांनी अर्धवट कापलेले सांबर तेथेच टाकून पोबारा केला. याबाबतची तक्रार कोनाळ येथील वनविभागाच्या कार्यालयात दिल्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
पाळये साळीचे टेंब येथील जंगलात रस्त्याच्या उजव्या बाजूला काही अंतरावर सांबराची शिकार करून त्याचे मांस कापले जात असल्याची माहिती गावातीलच ग्रामस्थ तुकाराम दळवी, राजाराम दळवी व इतरांना मिळाली. त्यांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी सांबराची शिकार करून त्याचे मांस कापले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गावातील ग्रामस्थ आल्याचे पाहताच तेथील शिकाऱ्यांनी अर्धवट कापलेले सांबर त्याचठिकाणी टाकून घटनास्थळावरून पोबारा केला. ग्रामस्थांनी पाहणी केली असता सांबराच्या पोटातील कोथळा तेथील नाल्यात टाकला असल्याचे दिसून आले. तसेच एका बाजूचा पाय व कातडी सोलून टाकण्यात आल्याचे आढळले.
ग्रामस्थांनी लागलीच या घटनेबाबत कोनाळ येथील वनविभागाच्या कार्यालयात दूरध्वनीवरून सांबराच्या शिकारीची कल्पना दिली. त्यानंतर कोनाळ वनपाल डी. बी. देसाई, वनरक्षक विश्राम कुबल व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर जात पंचनामा केला. मृत सांबराचे शीर घटनास्थळावर आढळून आले नाही. मात्र, सांबर नर जातीचे असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी हे शिकारी गावातीलच काही जण असल्याचा आरोप केला. दरम्यान, वनपाल डी. बी. देसाई यांनी चौकशी करून आरोपींवर गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)
फोटो : सोशल मिडीयावर
सांबराची शिकार केल्यानंतर मृत सांबर कापताना गावातील काही ग्रामस्थ घटनास्थळावर पोहोचले. त्यावेळी एकाने शिकाऱ्यांचे फोटो आपल्याकडील मोबाईलने काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वनविभागाला शिकाऱ्यांचा शोध सहजपणे लावण्यास मदत होणार आहे.