सावरकर यांचे विचार सर्वस्पर्शी अन् सर्वकालीन

By Admin | Published: January 29, 2016 11:29 PM2016-01-29T23:29:29+5:302016-01-29T23:46:55+5:30

नितीन गडकरी : २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन

Savarkar's thoughts are all touching and all-time | सावरकर यांचे विचार सर्वस्पर्शी अन् सर्वकालीन

सावरकर यांचे विचार सर्वस्पर्शी अन् सर्वकालीन

googlenewsNext

रत्नागिरी : माणसं बदलली, काळ बदलला मात्र प्रश्न तिथेच आहेत. सावरकरांचे साहित्य ज्वालामुखी सारखे आहे. समाजातील जातीयता, अस्पृश्यता, वाईट गोष्टी समूळ नष्ट होण्याची गरज आहे. सावरकरभक्तांनी पुरोगामी, प्रगतशील, समानतेचे पुरस्कर्ते, सर्वधर्मीयांना एकत्र करून जनजागरण करावे. सावरकरांचे विचार सर्वस्पर्शी असून, आजही उपयोगी पडणारे आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई व सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८ वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष व राष्ट्रीय विमुक्त-भटक्या आणि अर्ध भटक्या जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकूजी (दादा) इदाते, केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते, खासदार विनायक राऊत, खासदार अमर साबळे, आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, जयप्रकाश बर्वे आदी उपस्थित होते.
सावरकरांचे विचार व जीवन प्रेरणेचे स्त्रोत्र आहे. सावरकरांनी संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले. मात्र, देशाने त्यांच्या बाबतीत न्याय केला नाही. आज जगभरात आतंकवाद, अतिरेकी विचारांचे थैमान सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था उधळल्यामुळे अनेक निरपराधांचे बळी जात आहेत. पाकिस्तानात तर वाईट घटनांना वाईट म्हणण्याचीही ताकद चांगल्या माणसांमध्ये नाही, असे ते म्हणाले. सावरकरांचे साहित्य, जीवन जाज्वल्य आहे. सावरकरांचे विचार पोहोचवण्यात आपण यशस्वी झालो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व संमेलनाध्यक्ष दादा इदाते यांचे स्वागत करून सत्कार केला. डॉ. विद्याधर करंदीकर लिखित ‘तेजोमय’ पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, १४७ वर्षाची परंपरा असलेले वाचनालय संस्कार व सांस्कृतिक केंद्र आहे. वाचनालयाचे नामकरण सावरकरांनी केले. हे संमेलनही संस्मरणीय होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
संमेलनाध्यक्ष दादा इदाते यांनी सांगितले की, सावरकरांचे विचार हे जगण्याचे विचार होऊ शकतात. सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हेच राष्ट्रीयत्वाचे सूत्र असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आनंद पाटणकर यांनी केले. यावेळी उपनगराध्यक्ष संजय साळवी, नगरसेवक उमेश शेट्ये राजन मलुष्टे, बबन पटवर्धन, दिलीप पाखरे, आनंद पाटणकर, कॅ.दिलीप भाटकर, विनायक हातखंबकर, शेखर पटवर्धन, रवींद्र साठे, जयप्रकाश बर्वे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


दुपारी २.३० चा नियोजित कार्यक्रम दुपारी ३.४५ वाजता सुरू झाला. दीपप्रज्वलन, सत्कार, पुस्तक प्रकाशन व केंद्रीय मंत्री गडकरींचे अवघे दहा मिनिटांचे भाषण मिळून मोजून वीस मिनिटात दुपारी ४.०५ वाजता मंत्रीमहोदयांनी कार्यक्रम आटोपला.
पतितपावन मंदिर येथून गं्रथदिंडीला प्रारंभ झाला. लक्ष्मीचौक येथील वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिंडी रामनाका, जयस्तंभमार्गे संमेलनस्थळी आली. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थीवर्ग तसेच सावरकर जीवनावर आधारीत चित्ररथ दिंडीत सहभागी झाला होता. खेडशी येथील महालक्ष्मी विद्यालय, पटवर्धन हायस्कूल, फाटक हायस्कूल, विजू नाटेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते. स्वागताध्यक्ष खासदार विनायक राऊत, संमेलनाध्यक्ष दादा इदाते, कार्याध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, पतितपावन संस्थाध्यक्ष अ‍ॅड. बाबा परूळेकर, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले.

Web Title: Savarkar's thoughts are all touching and all-time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.