खाडीत बुडालेल्या पर्यटकाला वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:13 PM2018-04-15T23:13:26+5:302018-04-15T23:13:26+5:30
मालवण : देवबाग येथील त्सुनामी आयलंड येथील खाडीपात्रात रविवारी बुडालेल्या अविनाश दिलीप दळवी (वय २८, रा. नाशिक) या पर्यटकाला त्याच्या सहकाऱ्यांसह ग्रामस्थांनी वाचविले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मालवण देवबाग येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अक्षय होतकर (वय २५, रा. रेठरे धरण, सांगली), सचिन भगत (२५, रा. खटाव, सातारा), संकेत फड (२५, रा. खोपोली, रायगड), सागर कांबळे (२६, रा. रेठरे धरण, सांगली), गौरव पाटील (२२, रा. नाशिक), अविनाश दळवी (२८, रा. नाशिक), बिपीन पॉल्सन (२३, रा. नाशिक), कैलास पाटील (२२, रा. नाशिक) या आठ पर्यटकांचा ग्रुप १३ एप्रिलला येथे पर्यटनासाठी आला होता. यातील काहीजण मुंबईतील जेएसडब्ल्यू या कंपनीत कामास आहेत. ते शहरातील चिवला बिच येथील हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. रविवारी सकाळी ते देवबाग त्सुनामी आयलंड येथे गेले. तेथे वॉटरस्पोर्टस्चा आनंद लुटल्यानंतर ते खाडीपात्रात अंघोळीसाठी उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अविनाश दळवी हा बुडू लागला हे पाहून त्याचा मित्र अक्षय होतकर याने त्याला वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले. देवबाग ग्रामस्थही घटनास्थळी धावले. त्यांनी त्याला पाण्याबाहेर काढत तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. त्यानंतर अधिक उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, अविनाशच्या फुप्फुसात पाणी गेल्याने त्याच्याकडून उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता. प्रकृती चिंताजनक बनल्याने १०८ रुग्णवाहिका बोलावून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
असाही योगायोग
गतवर्षी १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका प्राध्यापकासह सात विद्यार्थ्यांचा वायरी येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. आजच्या घटनेने गतवर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या.
अनर्थ टळला
अविनाश दळवी याचे ४ मे रोजी लग्न ठरले आहे. अंघोळीसाठी खाडीपात्रात उतरलेला अविनाश बुडाल्याने त्याच्या सहकाºयांना धडकी भरली होती. मात्र, प्रसंगावधान राखत त्याला बुडण्यापासून वाचविण्यात त्याच्या सहकाºयांना व ग्रामस्थांना यश आले.
स्थानिकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष
पर्यटकांना खाडीपात्रात अंघोळीसाठी जाऊ नये अशा सूचना करूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. शिवसेना पदाधिकाºयांनी रुग्णवाहिका आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी देवबागचे ग्रामसेवक युवराज चव्हाण, मनोज खोबरेकर यांच्यासह अन्य वॉटरस्पोर्टस् व्यावसायिक उपस्थित होते.