शेकडोंचे प्राण वाचविणारे सावंत भिकेकोनाळचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:48 PM2018-07-03T23:48:39+5:302018-07-03T23:48:42+5:30

Sawant Bhikkonnala, who saved hundreds of lives | शेकडोंचे प्राण वाचविणारे सावंत भिकेकोनाळचे

शेकडोंचे प्राण वाचविणारे सावंत भिकेकोनाळचे

Next

वैभव साळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील विष्णू झेंडे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मंगळवारी मुंबईत पश्चिम रेल्वेचे मोटरमन चंद्रशेखर भिकाजी सावंत यांनी प्रसंगावधान राखत समोर पूल कोसळला असताना इमर्जन्सी ब्रेक लावत शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविले. सावंत हे दोडामार्ग तालुक्यातील भिकेकोनाळ गावचे सुपुत्र आहेत.
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात छत्रपती शिवाजी टर्मिनसवर स्वत:च्या प्राणांची तमा न बाळगता लाऊडस्पीकरवर अनाऊन्सिंग करून हजारोंचे प्राण वाचविण्याचे कर्तृत्व दोडामार्ग तालुक्यातीलच विष्णू झेंडे यांनी केले होते. सावंत यांनीही समयसूचकता बाळगून शेकडोजणांचे प्राण वाचविल्याने दोडामार्ग तालुक्याचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल झाले आहे.
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि विलेपार्लेला जोडणारा गोखले पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी कोसळला. या दुर्घटनेत पाचजण जखमी झाले. मात्र, पश्चिम रेल्वेचे मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी जर प्रसंगावधान राखत इमर्जन्सी ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला नसता तर शेकडोंचे प्राण वाचले नसते. या घटनेने दोडामार्गवासीयांच्या २६-११ च्या आठवणी मात्र ताज्या झाल्या. हे दोन्ही प्रसंग जरी वेगवेगळे असले, तरी या दोन्ही प्रसंगात शेकडोंचे प्राण वाचविणारे सुपुत्र मात्र दोडामार्ग तालुक्याचेच असल्याचे समोर आले.
२६-११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात छत्रपती शिवाजी टर्मिनसवर एका बाजूने अतिरेक्यांचे संकट ओढवले असताना स्वत:च्या प्राणांची तमा न बाळगता लाऊडस्पीकरवर लोकांना माहिती देऊन त्यांचे प्राण वाचविणारे विष्णू झेंडे हे दोडमार्ग तालुक्यातील केर-भेकुर्ली गावचे होते. आणि त्यानंतर समोर पूल कोसळत असल्याचे दिसत असताना इमर्जन्सी ब्रेक लावून रेल्वे थांबवून शेकडोंचे प्राण वाचविणारे चंद्रशेखर सावंत हे या तालुक्यातीलच भिकेकोनाळ गावचे सुपुत्र असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या कर्तृत्वाचे तालुक्यातील जनतेतून कौतुक होत आहे.
या प्रसंगाविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी थेट संपर्क साधला असता त्यांनी संपूर्ण प्रसंगच कथन केला. आपण लोकल घेऊन अंधेरी स्थानकातून चर्चगेटच्या दिशेने निघालो होतो. गाडीने ताशी ५० किलोमीटरचा वेग पकडला होता. अचानक समोर पुलाचा भाग कोसळत असल्याचे दिसले आणि इमर्जन्सी ब्रेक लावला. गाडी थांबली आणि अनर्थ टळला. पूल कोसळण्यात काही सेकंदांचा फरक होता. लोकल व पूल या दोहोत फक्त ६० ते ६५ मीटरचे अंतर होते. आणखी काही सेकंद उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. पूल कोसळल्याची माहिती त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्यानंतर रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली, असे सावंत यांनी सांगितले.
‘आर्मी’मध्येही सेवा
चंद्रशेखर सावंत यांनी यापूर्वी भारतीय सैन्य दलातही सेवा बजावली आहे. त्यानंतर ते पश्चिम रेल्वेमध्ये मोटारमन म्हणून रूजू झाले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे मंगळवारी मोठा अनर्थ टळला. त्याचबरोबर दोडामार्ग तालुक्याचे नावही उज्ज्वल झाले.
दोडामार्ग तालुक्याचा सुपुत्र असल्याचा अभिमान!
यावेळी चंद्रशेखर सावंत यांनी आपण दोडामार्ग तालुक्याचा सुपुत्र असल्याचा अभिमान आहे, अशी भावना व्यक्त केली. दोडामार्गसारख्या ग्रामीण तालुक्यातील भिकेकोनाळमधून मी मुंबईत आलो. सैन्यदलात सेवा बजावली आणि त्यानंतर मोटारमन म्हणून कर्तव्य बजावत असताना शेकडोंचे प्राण वाचविण्याचे काम माझ्या हातून घडले. त्यामुळे देहाचे सार्थक झाल्याची प्रतिक्रिया सावंत यांनी दिली.

Web Title: Sawant Bhikkonnala, who saved hundreds of lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.