सावंतवाडीवासीयांचा उद्या मूक मोर्चा
By admin | Published: December 10, 2014 10:19 PM2014-12-10T22:19:03+5:302014-12-10T23:52:56+5:30
कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी उमेश कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी नागरी कृती समिती स्थापन
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात चार दिवसांपूर्वी विजेच्या तारा पडून संदीप गवस व सागर हुक्केरी यांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी उमेश कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी नागरी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये गवस व हुक्केरी कुटुंबीयांसाठी शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन शुक्रवारी भव्य मूक मोर्चातून प्रांताधिकारी व महावितरणचे अधिकारी यांच्याजवळ देण्यात येणार आहे. निवेदनात मांडलेल्या मुद्द्यांचा पाठपुरावा या समितीतर्फे करणार असल्याची माहिती येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
सावंतवाडी नागरी कृती समितीचे अध्यक्ष उमेश कोरगावकर, उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर, सहाय्यक उपाध्यक्ष राजू पनवेलकर, सचिव संजू शिरोडकर, सहसचिव दिलीप भालेकर, खजिनदार आनंद नेवगी, सहखजिनदार नकुल पार्सेकर, कायदेविषयक सल्लागार सुभाष पणदूरकर तसेच सदस्य म्हणून बाबल्या दुभाषी, सतीश नार्वेकर, बाळ चोणकर, जयवंत कुलकर्णी, संजय पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
सावंतवाडी शहरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सावंतवाडीतील दोघांचा बळी गेला आहे. या घटनेचा दोघांच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी सावंतवाडी शहरातील नागरिकांनी एकत्र येत सावंतवाडी नागरी कृती स्थापन केली आहे.
शुक्रवार १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता महामूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचा प्रारंभ उभाबाजार-विठ्ठल मंदिर येथून होणार आहे. उभाबाजार, गांधी चौक, संचयनी पॅलेस, मोती तलाव, नगर परिषदमार्गे येथील प्रांत कार्यालयाकडे या मोर्चाचे विसर्जन होणार आहे. यावेळी निवेदन सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान, रिक्षा संघटनेही या मोर्चाला पाठिंबा दिल्याने शहरातील सर्व शाळांतील मुलांची गैरसोय होणार आहे. यामुळे सर्व शाळेतील संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन समितीतर्फे केले आहे. (वार्ताहर)
मदतीसाठी कृती समिती करणार पाठपुरावा
गवस व हुक्केरी कु टुंबियांसाठी शासनाकडून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. या रकमेस विलंब होऊ नये व त्या कुटुंबातील व्यक्तीस नोकरीत सामाविष्ट करून घेण्याची मागणी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. या सर्व मागण्या एका महिन्यात पूर्ण होण्यासाठी या कृती समितीतर्फे आंदोलने व पाठपुरावा करण्यात येणार आहे.