Sindhudurg News: वंचितची सावंतवाडी, दोडामार्ग कार्यकारिणी बरखास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 04:33 PM2023-01-31T16:33:51+5:302023-01-31T16:34:12+5:30
येत्या पंधरा दिवसांत तालुका कार्यकारिणी, सर्व आघाडी आणि गाव शाखा पुनर्बांधणी
सावंतवाडी : वंचित बहुजन आघाडीच्या दोडामार्ग व सावंतवाडी तालुका कार्यकारिणीबरोबर सर्व आघाड्या आणि गाव शाखा बरखास्त करण्यात आल्या आहेत. दोडामार्ग प्रभारी तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी नवसोा कदम, तर तालुका अध्यक्षपदाची विजय शेर्लेकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत तालुका कार्यकारिणी, सर्व आघाडी आणि गाव शाखा पुनर्बांधणी करून जिल्हा कार्यकारिणीकडे पाठविण्याचे आदेश जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी देले. म्हाळसाबाई भांडारकर हिंद छात्रालाय टेंबवाडी कणकवली येथे नुकतीच सर्व तालुका अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी यांची कृती बैठक जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी जिल्हा महासचिव प्रमोद कासले, जिल्हा संघटक श्यामसुंदर वराडकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शंकर जाधव, कार्यालयीन सचिव संदीप जाधव, देवगड तालुकाध्यक्ष प्रभाकर साळसकर, कणकवली तालुकाध्यक्ष संजय जाधव, सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय शेर्लेकर, नवसोा कदम, वागदे ग्रामपंचायत सदस्य दीपक कदम आदी उपस्थित होते.
यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायती निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. तालुक्यातील काही पदाधिकारी आणि माजी पदाधिकारी यांनी जिल्हा नेतृत्व विरोधात सभा घेतली. त्यामुळे त्याची दखल घेऊन पक्ष शिस्तभंगाच्या नोटिसा उपस्थित सर्वांना देण्याचे आणि त्यापैकी पदावर काम करत असलेल्या पदाधिकारी यांना पुढील निर्णयापर्यंत पदमुक्त करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
वंचित बहुजन आघाडी पक्षवाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यरत सर्व आजी-माजी पदाधिकारी यांची एकदिवसीय पद आणि त्यांची जबाबदारी, कर्तव्य आणि अधिकार याबाबत कार्यशाळा घेण्याची नितांत गरज असल्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.