सावंतवाडी दुहेरी हत्याकांड : आरोपीने इन कॅमेरा हत्याकांडाचा घटनाक्रम पोलिसांसमोर उलगडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 08:04 PM2021-11-19T20:04:30+5:302021-11-19T20:05:03+5:30
सावंतवाडी : दुहेरी हत्याकांड प्रकरणी पुन्हा ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपी कुशल टंगसाळी याचा ताबा गुरूवारी सावंतवाडी पोलिसांनी घेतला ...
सावंतवाडी : दुहेरी हत्याकांड प्रकरणी पुन्हा ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपी कुशल टंगसाळी याचा ताबा गुरूवारी सावंतवाडी पोलिसांनी घेतला आहे. आज, शुक्रवारी घटनास्थळाची व घराची इन कॅमेरा झाडाझडती घेत आरोपीने कसे हत्याकांड घडवून आणले यांचे प्रात्यक्षिक चित्रबध्द करण्यात आले. यावेळी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तब्बल तीन ते चार तास पोलिसांकडून हा सीन चित्रबध्द करण्यात येत होता. दरम्यान सायंकाळी उशिरा आरोपीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरातील उभाबाजार परिसरात राहणाऱ्या नीलिमा खानविलकर व शालीनी सावंत या दोघा वृद्धांचा खून केल्याप्रकरणी संशयित कुशल टंकसाळी याला अटक करण्यात आली आहे. सुरूवातीला त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. मात्र आणखी काही तपासासाठी पोलिसांनी त्याला न्यायालयीन कोठडीतून पुन्हा पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
आज दिवसभर पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात आली. या वेळी पोलिसांनी घटनास्थळाची व घराची इन कॅमेरा झाडाझडती घेत आरोपीने कशा हत्याकांड घडवून आणले हे प्रात्यक्षिक स्वता आरोपीने दाखवल्यानंतर तसे चित्रबध्द करण्यात आला. पोलीस बारकाईने सर्व घटनाचा शोध घेत आहेत.
तसेच घटनास्थळी नागरिकाची वर्दळ वाढू नये यासाठी पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली होती. तर परिसरात जाण्यास अटकाव करण्यात आला होता. चौकशी व झाडाझडतीबाबत अधिक बोलण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला. दरम्यान दिवसभराचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीसांकडून आरोपीला सायंकाळी उशिरा न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून त्याची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.