कैद्याच्या मृत्यूप्रकरणी सावंतवाडी कारागृह अधीक्षकांची बदली; येरवडा कारागृह प्रशिक्षण केंद्रात हजर होण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:46 PM2020-01-27T22:46:08+5:302020-01-27T22:50:39+5:30
कैद्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कारागृहाचे अधीक्षक योगेश पाटील यांची अखेर पुणे येथील येरवडा कारागृह प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी कारागृहात देवगड येथील राजेंद्र गावकर या कैद्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कारागृहाचे अधीक्षक योगेश पाटील यांची अखेर पुणे येथील येरवडा कारागृह प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सोमवारी कारागृह प्रशासनास प्राप्त झाले असून, पाटील यांना आपला कार्यभार प्रभारी अधिकार्यांकडे देण्याचे आदेश दिले आहेत.
सावंतवाडी कारागृहातील कैदी राजेंद्र गावकर यांचा एक महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता, हा मृत्यू कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची चर्चा सर्वत्र होती. या प्रकरणी पोलीस ही कसून चौकशी करत होते. मध्यंतरी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी ही सावंतवाडी कारागृहाचे अधीक्षक योगेश पाटील यांची तीन दिवस कसून चौकशी केली होती. तसेच गावकर यांच शवविच्छेदन करणारे कोल्हापूर येथील वैद्यकीय पथकही गावकर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची तपासणी करण्यासाठी सावंतवाडी कारागृहात आले होते. त्यामुळे सावंतवाडी कारागृहाचे कामकाज चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
कारागृह अधीक्षकांवर कारवाई होणार हे निश्चित होते. त्यातच सोमवारी कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांची पुणे येथील येरवडा कारागृहात प्रशिक्षण केंद्रात बदली झाल्याचे आदेश प्राप्त झाले असून, आपला कार्यभार प्रभारी अधिकार्याकडे देऊन लागलीच पुणे येथे हजर होण्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत कारागृह प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून, तसे पत्र आल्याचे मान्य केले आहे.