संशयास्पद वाटल्याने वाहतूक पोलिसांनी गाडी थांबवली, अन्...
By अनंत खं.जाधव | Published: August 25, 2022 06:24 PM2022-08-25T18:24:37+5:302022-08-25T18:25:15+5:30
एका पोलिस कर्मचार्याने त्यांना घेवून उपजिल्हा रुग्णालय गाठले. मात्र वाटेतच त्या अत्यवस्थ असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला.
सावंतवाडी : अत्यवस्थ असलेल्या तरुणाला नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार बावळाट तिठ्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांमुळे उघड झाला. हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्या युवकाला रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले.
मानतेश चंद्रप्पा कुमारी (वय-३८, रा. बेळगाव-बैलहोंगल) असे त्याचे नाव आहे. यात तुर्तास तरी संशयास्पद असे काहीच नाही. ती व्यक्ती अति प्रमाणात मद्यसेवन करित होती, त्यामुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दाणोली-बावळाट येथे तपासणी नाक्यावर वाढत्या चोर्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री तपासणी करण्यात आली होती. यावेळी एक कार त्या ठिकाणी असलेल्या अजित घाडी, प्रविण सापळे, विलास नर, प्रशांत आरोलकर, मयुर सावंत आदी पोलिस कर्मचार्यांनी थांबवली असता, त्यात चार व्यक्ती एका तरुणाला धरुन बसलेले दिसले.
यावेळी त्याच्याबाबत विचारणा केली असता तो बेशुध्द असल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिसांना त्यात काही तरी संशयास्पद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला तुम्ही गावाला नेण्यापुर्वी रुग्णालयात न्या, असा सल्ला पोलिसांना दिला. तसेच त्यातील एका पोलिस कर्मचार्याने त्यांना घेवून उपजिल्हा रुग्णालय गाठले. मात्र त्या ठिकाणी दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा वाटेतच मृत्यू झाला, असे वैद्यकीय अधिकार्यांकडुन सांगण्यात आले.