सावंतवाडीचे मुख्याधिकारी शिंदे गटाचे शाखाप्रमुख, बबन साळगावकरांची घणाघाती टीका
By अनंत खं.जाधव | Published: June 27, 2023 04:03 PM2023-06-27T16:03:46+5:302023-06-27T16:04:41+5:30
सावंतवाडी : येथील पालिकेच्या मुख्याधिकारी सागर सांळुखे यांनी शिंदे गटाचे शाखाप्रमुख असल्या सारखे काम करू नये. त्यांनी सर्वसामान्य लोकांची ...
सावंतवाडी : येथील पालिकेच्या मुख्याधिकारी सागर सांळुखे यांनी शिंदे गटाचे शाखाप्रमुख असल्या सारखे काम करू नये. त्यांनी सर्वसामान्य लोकांची कामे तात्काळ करावीत, असा सल्ला सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला. दरम्यान मी पाठवलेल्या अभ्यगंताचा अपमान म्हणजे माझा अपमान आहे. त्यामुळे हा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नाही, असे सांगत भविष्यात नगरपरिषदेत आमची सत्ता असू शकते, असा इशाराही यावेळी दिला.
साळगावकर म्हणाले, लोक आमच्याकडे काम घेऊन येतात याचं कारण नगरपरिषदेमध्ये होत असलेला विलंब आहे. सावंतवाडीतील नागरिक सुजाण आहेत. मात्र तुम्हाला अधिकार आहेत म्हणून लोकांचे अपमान करू नका, एका छोट्या घरासाठी दुरूस्ती फि भरूनही दोन-दोन महिने परवानगी मिळत नाही याचा अर्थ काय? या कामासाठी आम्ही जर फोन लावला तर तुम्हाला राजकारण वाटतं. वैयक्तिक घरांची परवानगीचे काम होणार नाहीत. तर काय तुम्हाला बिल्डरांच्या कामासाठी तिथे बसवले का? असा सवाल ही त्यांनी केला.
लोक आमच्याकडे विश्वासाने येतात कारण आमच्याकडून काम होतील हा आमच्यावरील असलेला त्यांचा विश्वास आहे. गेले २५ वर्षे या नगर परिषदेमध्ये मध्ये नगरसेवक म्हणून काम केलं आहे. त्यातील साडेचार वर्ष उपनगराध्यक्ष तसेच पुढील आठ वर्ष नगराध्यक्ष म्हणून या शहराचा कारभार सांभाळला आहे. चुकीचं काम करा म्हणून आम्ही कुठल्याही अधिकाऱ्यावरती आज पर्यत दबाव टाकलेला नाही. आम्हाला निष्पक्षपाती कामाची तुमच्याकडून अपेक्षा आहे. निष्पक्ष काम करा कुणाचेही शाखाप्रमुख म्हणून काम करू नका.असा सल्ला त्यांनी दिला.