मुसळधार पावसाने सावंतवाडी तालुकावासियांची उडविली दाणादाण
By admin | Published: June 27, 2016 11:23 PM2016-06-27T23:23:10+5:302016-06-28T00:35:54+5:30
अनेक गावे अंधारात : कोंडुरे, होडावडा पूल पाण्याखाली ; वीज वितरणचे नुकसान ; जनजीवन विस्कळीत
सावंतवाडी : सावंतवाडी परिसरात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळला. यात अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून, तालुक्यातील बहुतांशी पुले पाण्याखाली गेली होती. मात्र सोमवारी सायंकाळी पावसाचा जोर मंदावल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. तालुक्यातील अनेक गावांमध्ये झाडे कोसळल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे. सायंकाळपर्यंत येथील तहसीलदार कार्यालयाते ७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. या पावसात तालुक्यात तब्बल पाच लाखाचे नुकसान झाले आहे.
सावंतवाडी परिसरात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत होता. पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच एवढ्या जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याचे दिसून येत होते. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. तर कोंडुरा तसेच होडावडा पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. कोंडुरे पुलावर तर सकाळपासून पाणी होते. त्यामुळे गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला. कदंबा तसेच एसटी बसेसही ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही.
बांदा परिसरातही पावसाचा जोर कायम होता. यात तांबोळी येथील मधुकर सावंत यांच्या घरावर झाड कोसळल्याने तब्बल लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरात असलेली माणसे यातून बचावली. तर बाबुराव शेटकर यांच्या घरावरही झाड कोसळले. यात त्यांचे दहा हजारांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही घरांचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे. ओटवणे, माडखोल, कलंबिस्त, वेर्ले परिसरातही पावसाचा जोर कायम होता. अनेक गावांना जोडणारी छोटी पुले पाण्याखाली गेल्याने शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.
सावंतवाडीतून सकाळी सुटणाऱ्या एसटी बसेसही उशिराने सोडण्यात आल्या. मात्र, पावसामुळे नेहमीसारखी एसटीची वर्दळ दिसत नव्हती.
होडावडे, निरवडे, तळवडेसारख्या भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने गावे अंधारात होती. उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नव्हता. वीज वितरण विभागाचे अधिकारी गावागावात ठाण मांडून होते. सावंतवाडी शहरात मुसळधार पाऊस कोसळल्याने मोती तलावातील पाण्याची पातळी वाढली आहे. तर जिमखानानजीक संरक्षक भिंत कोसळली. मात्र, यात कोणतीही हानी झाली नाही.
तळवडे : सावंतवाडी-वेंगुर्ले मार्गावरील होडावडे पुलावर पाणी आल्याने दुपारी चार तास वाहतूक बंद होती. रविवारी रात्री उशिरा होडावडे बाजारपेठेनजीकचे जुनाट आंब्याचे झाड सावंतवाडी-वेंगुर्ले मार्गावर कोसळल्याने सकाळी ८.३० वाजेपर्यंत वाहतूक बंद होती. होडावडे परिसरात विद्युत वितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विद्युत खांबावर आंब्याचे झाड कोसळल्याने होडावडे गावातील वीजपुरवठा खंडित झाला. बांधकाम विभाग आणि विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ दाखल होत आंब्याचे झाड तोडले आणि विद्युत तारा बाजूला केल्या.
मळेवाड : मळेवाड-गोवा मुख्य मार्गावर असलेले कोंडुरे पूल सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले. त्यामुळे गोव्याकडे जाणारे सर्व मार्ग बंद झाले. या मार्गावरून जाणाऱ्या बांदा-वेंगुर्ले आणि वेंगुर्ले-पणजी एसटी बसेस अडकून पडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. (प्रतिनिधी)