सावंतवाडी टर्मिनस झालंच पाहिजे, काँग्रेसची आक्रमक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 03:00 PM2018-07-22T15:00:08+5:302018-07-22T15:00:14+5:30
सावंतवाडी-मळगाव येथील रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा मिळूनही या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने रेल्वे स्थानकावर आंदोलन छेडत स्थानकप्रमुखांना निवेदन देण्यात आले.
तळवडे : सावंतवाडी-मळगाव येथील रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा मिळूनही या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने रेल्वे स्थानकावर आंदोलन छेडत स्थानकप्रमुखांना निवेदन देण्यात आले. येत्या काही दिवसांत गाड्यांना थांबा न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन होऊन कित्येक महिने उलटून गेले, तरी टर्मिनसचे काम अपूर्णावस्थेत असल्याने तसेच विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने शनिवारी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. जनतेला विकासाचे गाजर दाखवून फसविण्यात येत असल्याची टीका करीत भाजप व शिवसेना सरकारचा घोषणा देऊन निषेध केला. सावंतवाडी रेल्वेस्थानक हे ‘अ’ दर्जाचे स्थानक आहे.
तीन वर्षांपूर्वी याची रेल्वे टर्मिनस म्हणून घोषणा झाली. मोठा गाजावाजा करून माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन केले. मात्र या ठिकाणी नवीन काही केले नाही. कोकण रेल्वे असे नाव देऊनही किती गाड्या कोकणच्या शेवटच्या स्थानकावर थांबतात? असा जाब स्थानकप्रमुख एस. महाजन यांना विचारत या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्याच पाहिजेत, अशी मागणी प्रांतिक सदस्य चंद्रकांत गावडे यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.
यावेळी चंद्रकांत गावडे यांच्यासह सावंतवाडी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, शहराध्यक्ष बाबल्या दुभाषी, बाळा जाधव, आबा सावंत, दिगंबर परब, संजय लाड, महिला तालुकाध्यक्षा अमिदी मेस्त्री, माजी जिल्हा परिषद सदस्या निकिता जाधव, नूतन सावंत, माया चिटणीस, विभावरी सुकी, आशा कंटक, संतोष जोईल, अॅड. राघवेंद्र नार्वेकर, महेश खानोलकर, सुधीर मल्हार, उमेश सावंत, संजय लाड, महेश देऊलकर, कौस्तुभ गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी स्थानकावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
प्रशासनाचे लक्ष वेधले
यावेळी काँग्रेसच्यावतीने स्थानकप्रमुख एस. महाजन यांना निवेदन देण्यात आले. यात दादर-तुतारी गाडी एक नंबर प्लॅटफॉर्मवरून सुटावी, रेल्वे प्रकल्पग्रस्तांना स्टॉल उपलब्ध करून द्यावेत, स्थानकानजीकच्या जुन्या सावंतवाडी-मळगाव-मळेवाड या जोडरस्त्याची दुरुस्ती करावी, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाव्यात तसेच स्थानकाचा टर्मिनसनुसार विकास व्हावा आदी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.