सावंतवाडीला गारांच्या पावसाने झोडपले

By admin | Published: April 17, 2015 10:47 PM2015-04-17T22:47:46+5:302015-04-18T00:01:48+5:30

नागरिकांची तारांबळ : कुडाळसह दोडामार्ग तालुक्यात तुरळक सरी

Sawantwadi was hit by the hailstorm | सावंतवाडीला गारांच्या पावसाने झोडपले

सावंतवाडीला गारांच्या पावसाने झोडपले

Next

सावंतवाडी : सावंतवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी मुसळधार पावसासह गारा पडल्या. अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पावसाच्या सरीसह पडलेल्या गारांचा आनंद येथील लहान मुलांसह नागरिक लुटताना दिसत होते. मात्र, दोन तास पडणाऱ्या या पावसामुळे आंबा व काजू बागायतदार होणाऱ्या नुकसानीमुळे चिंतेत पडले आहेत.
जिल्ह्यात गेले चार दिवस ढगाळ वातावरण पहावयास मिळत आहे. गुरुवारी कणकवली तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असतानाच शुक्रवारी या पावसाने जिल्हाभर उपस्थिती दर्शविली. सावंतवाडी तालुक्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास आभाळ दाटून आले होते. मात्र, गेले चार दिवस ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना पाऊस पडेल असे अपेक्षित नव्हते. मात्र, दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने चाल केली. यावेळी सावंतवाडी तालुक्यात ठिकठिकाणी गारा पडल्या.
या गारांच्या पावसाचा आनंदही अनेक ठिकाणी लहान मुलांसह युवकांनीही घेतला. गारा गोळा करत त्याचे फोटो काढत युवकांनी सोशल मीडियावर टाकले. अवचितपणे पडलेल्या गारांमुळे शेतकरी व बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतेत पडलेले दिसत आहेत. सावंतवाडीतील बांदा परिसरातही तासभर पाऊस पडत होता. यामुळे बांदा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत
होते. (प्रतिनिधी)


पावसापुढे बागायतदार, शेतकरी हतबल
गारांचा पाऊस झाल्याने येथील शेतकरी व बागायतदारांच्या हातातील उत्पादनावर पाणी पडले आहे. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने यावर्षी शेतकऱ्याला पुरते नामोहरण केले आहे. बागायतदारही निसर्गाच्या या कोपामुळे त्रस्त आहेत. अचानक लागणाऱ्या आगींमुळे शेकडो एकर बागायती जळून गेल्या असतानाच उरलेल्या उत्पादनाच्या आशेवर असलेल्या बागायतदारांची या गारपीटीसह पडलेल्या अवकाळी पावसाने नुकसान केले आहे.
वेंगुर्ले, कुडाळात हजेरी, दोडामार्गात तुरळक सरी
कुडाळ व वेंगुर्ले तालुक्यात पावसाने दुपारी हजेरी लावली. अचानक गडगडाटासह सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचा खोळंबा झाला. तसेच छत्र्या वा रेनकोट नसल्याने बरेच वाहनचालक भिजतच प्रवास करत होते. या अवकाळी पावसामुळे कुडाळ व वेंगुर्ले परिसरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. दोडामार्ग तालुक्यात मात्र, दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र, अन्य ठिकाणांप्रमाणे दोडामार्गात केवळ तुरळक सरी पडल्या.

Web Title: Sawantwadi was hit by the hailstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.