सावंतवाडीकरांना मोती तलावाची साद

By admin | Published: September 6, 2016 11:02 PM2016-09-06T23:02:20+5:302016-09-06T23:42:52+5:30

नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम : काव्यातून इतिहास आणि वर्तमानाची माहिती; शहराच्या ऐतिहासिकतेला संस्काराची जोड

Sawantwadiers will be able to get rid of Moti Lake | सावंतवाडीकरांना मोती तलावाची साद

सावंतवाडीकरांना मोती तलावाची साद

Next

प्रसन्न राणे -- सावंतवाडी -मी सावंतवाडीचा मोती तलाव बोलतोय....माझ्या अंगाखांद्यावर खेळलेले मूळ सावंतवाडीकर तुम्ही गणेश चतुर्थीनिमित्त पुन्हा शहरात आल्याने माझाही आनंद ओसंडून वाहतो आहे’, अशा सुंदर आणि भावनिक काव्यातून गणेशोत्सवाला आलेल्यांचे स्वागत जणू मोती तलावच करीत असल्याची साद सुंदरनगरीत अनुभवयास मिळत आहे. हा अनोखा उपक्रम सावंतवाडी नगरपरिषदेने राबविला असून संपूर्ण शहरातील सर्व वाड्यावस्त्यांमध्ये गाडी फिरवून याचा निनाद ऐकविला जात आहे. हा उपक्रम शहरवासियांच्या चांगलाच पचनी पडला असून अशाप्रकारे गणेशोत्सवात चाकरमान्यांचे करण्यात येत असलेले अनोखे स्वागत कौतुकास्पद ठरत आहे.
‘तलावाच्या काठावर वसलेली जगात काही मोजकीच शहरे आहेत. त्यापैकीच मी एक सावंतवाडीचा मोती तलाव’ अशा वाक्याने काव्याला सुरुवात होते. ‘माझा जन्म संस्थान काळामधला, ३५० वर्षांहून अधिक काळ मला लोटला. माझ्या अंगाखांद्यावर खेळलेले तुम्ही मूळ सावंतवाडीकर आहात. नोकरीधंद्यानिमित्त तुम्ही विविध शहरात राहत आहात. परंतु न चुकता तुम्ही गणेशोत्सवानिमित्त सुंदरवाडीमध्ये येता. त्यामुळे माझा आनंद ओसंडून वाहत असतो. म्हणून मी तुम्हां लेकरांचे मन:पूर्वक स्वागत करीत आहे’ अशी भावनिक काव्याची सुरुवात केली आहे. ‘सध्याच्या बदलत्या युगात ‘मी’ही बदलत चाललो. सावंतवाडी शहर हे कात टाकून नव्याने उभे राहिले आहे. शहराची ख्याती सर्वदूर पसरली आहे. हे मी अभिमानाने सांगत आहे. याचे श्रेय सावंतवाडी नगरपरिषदेला जाते.’, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. अनेक लोक बाटल्या, प्लास्टिक, कचरा टाकून मला विरूप करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी हे निमूटपणे सहन करीत असतो. परंतु दुसऱ्याच दिवशी नगरपरिषदेचे कर्मचारी मला निर्मळ करतात. त्याबद्दल मी नगरपरिषदेला धन्यवाद देतो. आज शहरात अनेक सुविधा नगरपरिषदेने निर्माण केल्या आहेत. शहरात सकाळी घरोघरी घंटागाड्या जाऊन ओला व सुका कचरा गोळा करतात. शहरातील ८० हॉटेल्सचा कचरा नगरपरिषदेच्या स्वतंत्र वाहनामार्फत गोळा करून विल्हेवाट लावली जाते.
आता या शहराने प्रथमच ‘नागरी पक्षी’ म्हणून भारद्वाज या पक्षाची निवड लोकमतदानाद्वारे केली आहे. अशाप्रकारे सिटी बर्ड निवडणारी सावंतवाडी नगरपरिषद ही देशातील पहिलीच नगरपरिषद आहे. शहरात मुबलक पाणी देण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी अथक परिश्रम घेतात. तसेच सावंतवाडी शहरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात ‘पर्यटन महोत्सव’ साजरा केला जातो.
मोती तलावाच्या कुशीत दिवाळी पाडवा पहाट दरवर्षी साजरी केली जाते. दरवर्षी मे महिन्यात ‘फ्रुट अँड फ्लॉवर फेस्टिव्हल आॅफ मोती तलाव’ आयोजित केला जातो. ही माझी वेगळी ओळख नगरपरिषदेने जगाला करून दिली आहे.’ अशा या सुंदर कवितेतून शहराची ओळख आपल्या सुंदरवाडीत येणाऱ्या मूळ सावंतवाडीवासियांचे स्वागत करीत आहे. सावंतवाडी शहरात लहानाचे मोठे झालेले नागरिक तसेच प्रामुख्याने ज्यांनी मोती तलावाचा काठ खऱ्या अर्थाने अनुभवला अशा मूळ सावंतवाडीवासियांना या भावनिक काव्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या या अनोख्या उपक्रमाचे चाकरमान्यांकडून भरभरून स्वागत होत आहे. पण त्याचबरोबर शहरवासियांतूनही याचे विशेष कौतुक केले जात आहे. आपल्या परंपरा आणि रितीरिवाज यांची आत्मीयतापूर्वक सांगड घालून सुसंस्कृती निर्माण करण्याचा आणि ती टिकविण्याचा प्रयत्न नगरपरिषदेने केला आहे.


स्वातंत्र्यपूर्व काळापासून सावंतवाडी संस्थानाला ऐतिहासिक वारसा असून तो आजही कायम आहे. या वारशात नानाविध प्रकारांनी भर घालणारे अनेक शहरवासीय नोकरीनिमित्त बाहेरगावी आहेत. ते गणेशोत्सवानिमित्त शहरात आल्यानंतर त्यांना आपले शहर आदर्श आणि स्मार्ट झाल्याचा आनंद मिळावा, हा हेतू ठेवूनच ही संकल्पना राबविली आहे. शिवाय डिजिटल फलकांतून शहराचे विद्रुपीकरण थांबविण्यास सर्व नगरसेवक, पदाधिकारी, संस्था,संघटना यांनी मोलाची साथ दिल्याने यंदा मूळ सावंतवाडीवासियांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्याचा मानस पूर्ण झाला आहे.
- बबन साळगावकर, नगराध्यक्ष, सावंतवाडी

स्मार्ट सिटीच्या मार्गक्रमणाची माहिती
वर्षानुवर्षे बाहेर असलेले शहरातील नागरिक सध्या स्मार्ट सिटीत राहत आहेत. त्यामुळे गावी आल्यावर वेगळेच अनुभवले जाते, मात्र या कवितेतून आपली सिटी ही स्मार्ट सिटीकडे वळू लागली आहे. याची ओळख करून दिली जात आहे.

Web Title: Sawantwadiers will be able to get rid of Moti Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.