'कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली'...संजू परबांच्या वक्तव्यावरुन तेली समाज आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 03:48 PM2021-11-25T15:48:20+5:302021-11-25T16:09:08+5:30
सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना 'कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली' असा टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेवरुन आता तेली समाज आक्रमक झाला आहे.
कणकवली : सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकीय वादातून टीका करताना 'कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली' असा उल्लेख केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. संजू परब या वक्तव्याचा समस्त तेली समाजाच्यावतीने निषेध करण्यात आला. त्यांनी दिलगिरी व्यक्त करून आपले विधान मागे घ्यावे. अन्यथा आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तेली यांनी समाजाच्यावतीने दिला आहे.
सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना 'कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली' असा टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेवरुन आता तेली समाज आक्रमक झाला आहे. कणकवली तेली आळी येथील सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत त्यांनी परब यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
यावेळी बोलताना चंद्रकांत तेली म्हणाले , गंगू तेली ही व्यक्तीरेखा इतिहासातच नव्हती. राजा भोज यांच्या काळात गांगेय नरेश आणि चालुक्य तैलेय हे दोघे राजा होते. ते दोघे एकत्र येऊन भोज राजाशी लढले. ते गद्दार नव्हते. त्याची तुलना करताना शब्दांचा अपभ्रंश झाला आहे. त्यामुळे राजकीय वक्तव्य करताना जातीचा उल्लेख करून आमच्या भावना कोणीही दुखावू नयेत.
परशुराम झगडे म्हणाले, या वक्तव्यामुळे आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. जिल्हयातील आमच्या समाजबांधवांच्या या विषयावरील भावना तीव्र आहेत. त्यामुळे त्याबाबत संजू परब यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही तर त्याचा फटका निश्चितच निवडणुकीत बसेल. आम्हीही विविध पक्षांचे काम करतो. मात्र, आपल्या समाज संघटनेचे काम करीत असताना आम्ही राजकीय पादत्राणे बाहेर काढून ठेवतो.
या पत्रकार परिषदेस तेली समाज उन्नती मंडळाचे जिल्हा सचिव चंद्रकांत तेली, खजिनदार परशुराम झगडे, माजी जिल्हाध्यक्ष आबा तेली, शैलेंद्र डिचोलकर, कणकवली तालुकाध्यक्ष प्रकाश काळसेकर, उपाध्यक्ष विशाल नेरकर, तालुका सचिव दत्ताराम हिंदळेकर, साई आंबेरकर आदी उपस्थित होते.