मालवण किनारपट्टीवरच टंचाईच्या झळा

By admin | Published: April 17, 2017 11:37 PM2017-04-17T23:37:58+5:302017-04-17T23:37:58+5:30

देवबाग, तळाशीलमध्ये क्षारयुक्त पाणी : किनारपट्टीभागात होणार टँकरने पाणीपुरवठा, तालुक्यात भूजल पातळी वाढली

Scarcity of water on Malvan coastline | मालवण किनारपट्टीवरच टंचाईच्या झळा

मालवण किनारपट्टीवरच टंचाईच्या झळा

Next



सिद्धेश आचरेकर ल्ल मालवण
मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच काही भागात पाण्याची मोठी समस्या भासते. गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने तसेच पंचायत समितीच्यावतीने चोख नियोजन राबविण्यात आल्याने मालवण तालुक्यात किनारपट्टीचा भाग वगळता यंदाच्या वर्षी पाणीटंचाईच्या झळा तितक्याशा जाणवू लागल्या नाहीत. तालुक्यातील काही गावांमध्ये नळपाणी योजनेच्या समस्या उद्भवू लागल्या असल्या तरी भीषण पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे चित्र आहे. मात्र, गेली काही वर्षे मार्चपासून किनारपट्टीवरील क्षारयुक्त पाण्याच्या समस्येला पर्याय उपलब्ध करून देणे प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य राहणार आहे.
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्षारयुक्त पाण्याची मोठी समस्या उभी आहे. क्षारयुक्त पाणी पिण्यास योग्य नसल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागते. दुसरीकडे काही गाव वगळता पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने पाणीटंचाईवर मात करण्यात यशस्वी झाले आहेत.
मालवण तालुक्यातील पाणी टंचाईच्या निवारणार्थ मालवण पंचायत समितीच्यावतीने जिल्हा परिषेदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्यात आलेल्या आराखड्यातील २५ कामाना मंजुरी मिळाली आहे.
तालुक्यातील आचरा जामडूलवाडी येथील एक काम हे राष्ट्रीय पेयजलमधून घेण्यात आले आहे. यात नळयोजना दुरुस्त करणे - मठबुद्रुक लिंग्रसवाडी, चाफेखोल गोसावीवाडी, निरोम भरडवाडी, मसुरे मर्डे, मालोंड गावठाणवाडी, आनंदव्हाळ कदमवाडी, वराड बौद्धवाडी, राठीवडे पुजारेवाडी या कामाचा समावेश आहे. विंधन विहीर विशेष दुरुस्तीमध्ये घुमडे घाडीवाडी, हडी भटवाडी, हडी देऊळवाडी, हडी गडगेवाडी, हडी गावकरवाडी, वायंगवडे धनगरवाडी या कामांचा समावेश आहे. नवीन विंधन विहिरीमध्ये बांदिवडे खोरेवाडी, बुधवळे कुडोपी बौद्धवाडी या कामांचा समावेश आहे.
तात्पुरती पूरक नळपाणी योजनेत वराड भरडवाडी, महान घाडीवाडी, आचरा जामडूल या कामांचा समावेश आहे. विहीर खोल करणे व गाळ काढणे तसेच सार्वजनिक विहीर दुरुस्ती करणे यात राठीवडे गोंजाचीवाडी, निरोम मांजरेकरवाडी, घुमडे घुमडाई मंदिर, कुंभारमाठ जरीमरीवाडी, निरोम देऊळवाडी, कोळंब कातवड, चाफेखोल मधली गावकरवाडी या कामांचा समावेश आहे.
तालुक्यातील तळाशीलसह सर्जेकोट, देवबाग गावातील विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत आहे. गोड्या पाण्याच्या विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून खारट पाण्याची तीव्रता वाढत असल्याने त्वचारोगासारखे आजार होण्याचीही शक्यता ग्रामस्थातून व्यक्त होत आहे.
दरवर्षी प्रामुख्याने सर्जेकोट आणि देवबाग संगम या भागात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागते. गतवर्षी तळाशील गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. किल्ले सिंधुदुर्गवरही उन्हाळी सुट्टीत पाण्याची समस्या भेडसावते. किल्ल्यात असलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरीतील पाण्याची पातळी घटली आहे. पुरातत्त्व विभागाकडून सुरु असलेल्या तटबंदीचे कामही पाण्याअभावी थांबविण्यात आले आहे.

Web Title: Scarcity of water on Malvan coastline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.