शिष्यवृत्ती परीक्षेला बसविले बोगस विद्यार्थी, तुळस केंद्रावरील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 05:39 PM2020-02-17T17:39:29+5:302020-02-17T17:41:38+5:30
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस हायस्कूल केंद्रावर रविवारी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील सुमारे २० ते २२ विद्यार्थी अनधिकृतपणे बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील तुळस हायस्कूल केंद्रावर रविवारी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील सुमारे २० ते २२ विद्यार्थी अनधिकृतपणे बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, याबाबत जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असून आपण शिक्षणाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सभापती अनुश्री कांबळी यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.
महाराष्ट्र राज्यात रविवारी सर्वत्र शासनमान्य शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आल्या. इयत्ता पाचवी व आठवीमधील विद्यार्थी या परीक्षेला बसविले जातात. वेंगुर्ला तालुक्यातील तुळस हायस्कूलमधील केंद्रात रविवारी जे विद्यार्थी बसविण्यात आले, त्यामधील अनेक विद्यार्थी अनोळखी असल्याचे दिसून आले.
पालकांनी त्या विद्यार्थ्यांची चौकशी केली असता, ती बरीच मुले ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नसून कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पालकांनी याबाबत आवाज उठवित त्या मुलांना या सेंटरवर परीक्षेला बसण्याची परवानगी कोणी दिली? याचा जाब विचारला.
दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य दादा कुबल यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी या हायस्कूलमध्ये धाव घेत पाहणी केली. तसेच या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता ही मुले मातोंड हायस्कूलच्या नावावर बसल्याचे समोर आले आहे. येथील मुलांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे.
शाळेत या परीक्षेच्या सराव परीक्षा होतात. त्यावेळी या शाळेतील मुलांकडून एकावेळी एका विषयाचे तीन किंवा चार पेपर लिहून घेतात. त्या पेपरवर वेगळ््या मुलांची नावे असतात, असे यावेळी मुलांनी पालकांशी बोलताना सांगितले.
यावेळी कुबल यांच्यासह परबवाडा सरपंच पपू परब, तुळसचे माजी सरपंच आपा परब, सदस्य शेखर तुळसकर यांच्यासह पालक उपस्थित होते.
शिक्षण विभागाने कारवाई करावी
घाटमाथ्यावरील मुले या परीक्षेत मेरीटमध्ये यावीत, यासाठी त्यांना वर्षभर या परीक्षेच्या क्लासला बसविले जाते आणि अशा पद्धतीने एखाद्या शाळेतून त्यांना परीक्षेला बसविण्यात येते. या प्रकारामुळे आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या हायस्कूलच्या भूमिकेवर शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.