शाळकरी विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू
By admin | Published: June 21, 2017 12:27 AM2017-06-21T00:27:20+5:302017-06-21T00:27:20+5:30
मालवण येथील घटना : गौडर कुटुंबीयांवर शोककळा
लोकमत न्यूज नेटवर्क
मालवण : शहरातील मेढा-राजकोट येथील आनंद रुद्राप्पा गौडर या १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा घरालगत असलेल्या विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास घडली.
मालवण मेढा येथे भाड्याने राहणारे रुद्राप्पा गौडर (मूळ रा. कर्नाटक) हे पत्नी व दोन मुलांसह गेली १० ते १२ वर्षे मालवण येथे मोलमजुरी करतात. (पान १ वरून) मेढा येथील पै यांच्या घरालगत एका खोलीत गौडर कुटुंबीय गेली काही वर्षे राहत आहेत. मंगळवारी सकाळी रुद्राप्पा हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. आई व बहिणीसोबत असलेला आनंद घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीतील मासे पहायला जातो, असे सांगून गेला, तो बराच वेळ न आल्याने आई व बहिणीने त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. काही वेळानंतर आनंद हा पावसाने पूर्ण भरलेल्या विहिरीत बेशुद्ध अवस्थेत माडाच्या झावळाखाली असल्याचे समजताच मेढा येथील योगेश मुळेकर या स्कुबा डायव्हरने विहिरीत उडी मारून आनंद याला बाहेर काढले.
टोपीवाला हायस्कूलकडून श्रद्धांजली
आनंद हा टोपीवाला हायस्कूल येथे सातवीत शिकत होता. तो बुडाल्याची माहिती मिळताच मुख्याध्यापक प्रदीप साटम व अन्य शिक्षकांनी आनंद याच्या घरी धाव घेतली. आनंद याला शाळा भरल्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी नगरसेवक गणेश कुशे, ममता वराडकर, मोहन वराडकर, दीपक पाटकर, यतीन खोत, संदीप शिरोडकर, गणेश कुडाळकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती आप्पा लुडबे, मधलो डिसोजा व अन्य लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी रुग्णालयात धाव घेत गौडर कुटुंबीयांचे सांत्वन केले.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक नागरगोजे व सिद्धेश चिपकर हे करीत आहेत. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उपचारापूर्वीच मृत्यू
मेढा भागात गटार खुदाईचे काम सुरू असताना महेश उर्फ डुबा गिरकर याला आनंद विहिरीत पडल्याची माहिती मिळाली. त्याने गौडर कुटुंबीय यांच्या घरी जात आनंद याला पाठीवर घेत ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आनंद याची तपासणी करून तो मृत झाल्याचे घोषित केले.