शाळकरी मुलींना फूस लावून अत्याचार
By admin | Published: February 14, 2016 12:54 AM2016-02-14T00:54:29+5:302016-02-14T00:54:29+5:30
कणकवली तालुक्यातील दोन युवकांना अटक
कणकवली : वेगवेगळ्या गावांतील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तालुक्यातील दोन युवकांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. जगदीश बांदिवडेकर (रा. कलमठ, गावडेवाडी) आणि अजय चिंचवलकर (वय २०, रा. भरणी, तांबळवाडी) अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत.
जगदीश बांदिवडेकर याचा फॅब्रिकेशनच्या व्यवसाय आहे व अजय चिंचवलकर हा त्याच्याकडे कामाला आहे. अत्याचारग्रस्त एका मुलीचा मामा अजय याच्या गावात असल्याने त्याची ओळख त्या मुलीशी झाली. त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, जगदीश बांदिवडेकर याचेही अन्य गावातील मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांनी आपल्या मैत्रिणींची भेट घडवून आणली होती. या दोन्ही मुली दहावीत वेगवेगळ्या हायस्कूलमध्ये शिकत आहेत. ६ फेबु्रवारी रोजी यातील एका मुलीची आजी तिला बोलल्याने ती चिडून घरातून बाहेर पडली आणि जगदीश याच्या मैत्रिणीच्या घरी गेली. या मुलीला आई-वडील नाहीत. चार दिवस ती मैत्रिणीकडे राहिली. १० फेबु्रवारी रोजी दोघीही घरातून बाहेर पडल्या.
दरम्यान, पहिल्या मुलीच्या मामाने तिच्या मैत्रिणीच्या पालकांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेले. मुलींच्या नातेवाइकांनी १२ फेबु्रवारी रोजी या दोघी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास करत दोन्ही मुलींसह युवकांना ताब्यात घेतले.
या कालावधीत या युवकांनी दोन्ही मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अजय चिंचवलकर व जगदीश बांदिवडेकर यांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व बलात्काराचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दोन्ही युवकांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कलमठ येथे ठेवले
दोन्ही मुली घरातून बाहेर पडल्यानंतर जगदीश बांदिवडेकर याने त्यांना कलमठ, गावडेवाडीतील शेतमांगरात आणून ठेवले होते. तेथे त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही मुलींना येथून ताब्यात घेतले.