ओझरम येथील एक शाळा मरता मरता जगली

By admin | Published: June 19, 2015 12:00 AM2015-06-19T00:00:25+5:302015-06-19T00:25:12+5:30

माजी विद्यार्थ्यांची धडपड : शाळेचा पट होता दोन आणि शिक्षक होते पाच

A school in Ozaram dies and dies | ओझरम येथील एक शाळा मरता मरता जगली

ओझरम येथील एक शाळा मरता मरता जगली

Next

मिलिंद पारकर -कणकवली -तिचे वय वर्ष १०६. माणसाचे वय वाढते तसे वृद्धत्व येते आणि संस्थेचे वय वाढते तसे ती तरूण होते. मात्र, तालुक्यात ओझरम येथील शाळा या वयात अगदी मरणासन्न झाली होती. पण प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी ठरवलं आणि शाळा मरता मरता जगली आहे. शाळेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी हे युवक कामाला लागले आहेत.
सिंधुदुर्गातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची अशी मरणासन्न स्थिती आली आहे. तालुक्याच्या ठिकाणी असलेली शाळा क्रमांक ४ केव्हाच इतिहासजमा झाली आहे. ४०० हून अधिक पट असलेली तालुक्याच्या ठिकाणची पंचायत समिती कार्यालयानजीकच्या शाळेवर ही वेळ आली. अशीच वेळ ओझरम येथील प्राथमिक शाळेवर येऊन ठेपली होती. मार्च २०१५ अखेरीचा शाळेचा पट होता २ आणि शिक्षक होते ५. कागदावर जरी पाच शिक्षक असले तरी कायम कामगिरीवर दोघा शिक्षकांना पाठवलेले असायचे.
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांना गळती लागण्याचे कारण म्हणजे सेमी इंग्लिशचा अभाव आणि खासगी शाळांच्या आधुनिकतेकडे पालकांची ओढ. ओझरम शाळेला लागलेली गळती आणि तिची मरणासन्न अवस्था तेथीलच या शाळेत शिकलेल्या काही युवकांना हलवून गेली.
त्यांनी ठरवले की शाळेला अशी हातची जाऊ द्यायचे नाही आणि ते कामाला लागले. शाळेत मुलांची संख्या वाढवण्यासाठी काही ग्रामस्थांनी आपल्या घरात काही मुलांना कायम ठेवून त्यांची जेवणखाण्याची सोय करण्याची तयारी ठेवली आहे.
पहिली आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले आहे. तर जिल्हा परिषदेने नव्याने जाहीर केलेल्या गणवेशासाठी ग्रामस्थांनी देणगी दिली आहे. शाळेत सेमी इंग्रजी शिकवण्यासह ई-लर्निंग सुविधा देण्यासाठी माजी विद्यार्थ्याच्या (संतोष राणे) देणगीतून प्रोजेक्टर घेण्यात आला आहे. अशोक राणे यांच्या माध्यमातून पहिली ते सातवी पर्यंतचा इलेक्ट्रॉनिक अभ्यासक्रम पुरविण्यात येणार आहे. या दोघांच्या सहकार्यातून ई लर्निंग प्रकल्प साकारण्यात येणार आहे. हमरस्त्याला ‘प्रवेश सुरू’चा बोर्ड जिल्हा परिषदेच्या शाळांना लावण्यात आलेला एकमेव फलक असावा.
या धडपडीतून या शैक्षणिक वर्षांच्या सुरूवातीला शाळेची पटसंख्या १८ झाली आहे. येत्या वर्षात अजून १५ ते २० मुले शाळेत आणण्याचा चंग ग्रामस्थांनी बांधला आहे.


आंतरराष्ट्रीय महनीय शाळेचे विद्यार्थी
ओझरम या शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी देशविदेशात मोठमोठ्या पदांवर काम करत आहेत. वर्ल्ड ट्रेड आॅर्गनायझेशनचे मुख्य विद्याधर राणे यातीलच एक. विद्याधर राणे हे ओझरम येथील रहिवासी असून त्यांचा आपल्या गावाशी नेहमी संपर्क असतो. अशा माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य शाळेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी घेण्यात येत आहे.
पालकांनी विचार करण्याची गरज
सेमी इंग्रजी आणि आकर्षकतेकडे धाव घेत खासगी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना घालणाऱ्या पालकांनी भविष्यात मराठी शाळा बंद पडल्यास खासगी शाळांचे दामदुप्पट शुल्क कंबरडे मोडेल हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मातृभाषेतूनच अभ्यासाच्या संकल्पना स्पष्ट होतात, असे एका शिक्षकाने यासंदर्भात बोलताना सांगितले.

Web Title: A school in Ozaram dies and dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.