शाळाबाह्य सुनीताच्या आयुष्यात शाळेचा ‘सुवर्ण’योग

By Admin | Published: April 1, 2015 10:53 PM2015-04-01T22:53:53+5:302015-04-02T00:46:49+5:30

श्रमाला बुध्दीची जोड : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने मुलीचं आयुष्य ‘साक्षर’ होणार

School Suvarna Yoga in School Life | शाळाबाह्य सुनीताच्या आयुष्यात शाळेचा ‘सुवर्ण’योग

शाळाबाह्य सुनीताच्या आयुष्यात शाळेचा ‘सुवर्ण’योग

googlenewsNext

टेंभ्ये : शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या शासनाच्या धोरणाची प्रचिती नुकतीच रत्नागिरी तालुक्यामध्ये आली. रत्नागिरीच्या गटशिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या प्रयत्नातून जवळपास दीड ते दोन महिन्यांपासून शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर असणारी एक शाळाबाह्य विद्यार्थिनी अखेर शिक्षण प्रवाहात दाखल झाली. गटशिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत वाटद खंडाळा भागामध्ये शाळा तपासणीसाठी गेल्या होत्या. यावेळी वाटद खंडाळा बाजारपेठशेजारी असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली काही मुलं खेळताना त्यांना दिसली. ही शाळेच्या वेळेत बाहेर असणारी मुले दिसताच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जवळ जाऊन चौकशी केली असता लक्षात आले की, त्या तीन मुलांपैकी दोन मुले ६ वर्षांपेक्षा लहान आहेत. पण एक मुलगी मात्र इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारी आहे. अधिक चौकशी केली असता लक्षात आले की, या मुलीचे नाव सुनीता अशोक शिंदे असे आहे.तिचे पालक अशोक शिंदे व आई संगीता शिंदे वाटद खंडाळा परिसरात स्टोव्ह दुरुस्तीचे काम करतात. ही मुलगी मदत करण्यासाठी त्यांनी सोबत आणली आहे. यापूर्वी ती गुहागर तालुक्यातील कोतळूक शाळा नं. १ येथे पाचवीच्या वर्गात शिक्षणाचे धडे गिरवत होती.
हा सर्व प्रकार गटशिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या लक्षात येताच त्यांनी विद्यार्थिनीच्या पालकाला विद्यार्थिनीला तत्काळ शाळेत पाठवण्याची सूचना दिली. संबंधित विद्यार्थिनी शाळेत दाखल झाली नाही तर पालकावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, अशी समज त्यांनी त्या पालकांना दिली.त्यानंतर वाटद-खंडाळा प्राथमिक शाळेस भेट देऊन तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांची या शाळाबाह्य विद्यार्थिनीबाबत कानउघाडणी केली. सोमवारी कोणत्याही परिस्थितीत ती मुलगी शाळेत दाखल होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर वाटद-खंडाळा हायस्कूलचे मुख्याध्यापक शत्रुघ्न लंबे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात सोमवारी दि. ३० रोजी त्या मुलीला दखल करण्यात आले.येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे एका मुलीचे शिक्षण पुन्हा सुरु झाले. अशा पद्धतीने भटकंती करणाऱ्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी मिळून विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. गटशिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला हा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे. (वार्ताहर)

ती शाळाबाह्य मुलगी शाळेत दाखल व्हावी, यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले व अखेरीस ती मुलगी शिक्षण प्रवाहात दाखल झाल्याचा आनंद झाला असल्याचे गटशिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी सांगितले.

Web Title: School Suvarna Yoga in School Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.