शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यासाठी गर्दी, लांबच रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 06:57 PM2020-11-20T18:57:33+5:302020-11-20T19:01:13+5:30
Coroanavirusunlock, teacher, sindhudurgnews ,educationsector, गेले आठ महिने बंद असलेल्या माध्यमिक शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी मोहीम १८ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. कणकवली तालुक्यातील ही चाचणी कणकवली शासकीय विश्रामगृहात होत आहे. १८ ते २२ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत तालुक्यातील एकूण ३६६ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे.
तळेरे : गेले आठ महिने बंद असलेल्या माध्यमिक शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी मोहीम १८ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. कणकवली तालुक्यातील ही चाचणी कणकवली शासकीय विश्रामगृहात होत आहे. १८ ते २२ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत तालुक्यातील एकूण ३६६ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड १९ची चाचणी मोहीम जिल्हाभर सुरू आहे. कणकवली तालुक्यातील माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचणीचा प्रारंभ १८ नोव्हेंबरपासून झाला आहे. तालुक्यातील ३१ शाळांमधील ३०० शिक्षक व ६६ शिक्षकेतर कर्मचारी मिळून ३६६ कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात येणार आहे.
गुरुवारपर्यंत करंजे, घोणसरी, नांदगाव, करुळ, हडपीड, एस. एम. हुंबरठ, आदर्श विद्यामंदिर सावडाव, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तळेरे हायस्कूल, एन. व्ही. मालंडकर कॉलेज, विद्यामंदिर हायस्कूल आदी शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. उर्वरित २० शाळांच्या चाचण्या पुढील तीन दिवसांत घेतल्या जाणार आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी लेखी दिली आहे.
शाळेत विविध ठिकाणचे विद्यार्थी येणार आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची चाचणी महत्त्वाची नसून त्यांना निव्वळ काही नियम व अटींचे बंधन घालण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थी सुरक्षित कसे राहू शकतील? केवळ कर्मचाऱ्यांची चाचणी करून विद्यार्थी सुरक्षित कसे राहू शकतात? असा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांना पडला आहे.
चाचणी बंधनकारक
कणकवली शासकीय विश्राम गृहाबाहेर सकाळपासून कर्मचाऱ्यांच्या रांगा लागलेल्या असतात. लॉकडाऊन काळात सर्व यंत्रणा बंद होती. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यानुसार २३ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ही चाचणी करणे बंधनकारक आहे.