विजयदुर्गमध्ये विज्ञानकेंद्र उभारणार
By Admin | Published: August 18, 2016 11:34 PM2016-08-18T23:34:15+5:302016-08-18T23:34:19+5:30
प्रमोद जठार : जागतिक हेलियम डे साजरा, येत्या वर्षभरात तारांगणाच्या पहिल्या टप्प्याचे काम
देवगड : जगात कुठेही हेलियम डे साजरा केला जात नाही, मात्र ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागल्यामुळे गेली दहा वर्षे हेलियम डे साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विजयदुर्ग येथे लवकरच विज्ञानकेंद्र उभारणीचे काम सुरू होणार असून वर्षभरामध्ये पहिल्या टप्प्यातील तारांगणाचे काम पूर्ण होणार आहे. असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.
यावेळी पुढे बोलताना प्रमोद जठार म्हणाले, पुढील हेलियम डे अगोदरच विजयदुर्ग येथे विज्ञानकेंद्राचा पहिला टप्पा पूर्ण होईल. विजयदुर्ग शासकीय विश्रामगृहानजीक बांधकाम विभागाच्या जागेत हे केंद्र साकारणार आहे. त्यामुळे त्याचा भविष्यात सिंधुदुर्गवासीयांना मोठा फायदा होणार आहे.
विजयदुर्ग किल्ल्यावर साहेबाचे ओटे या ठिकाणी हेलियम डे साजरा करण्यात आला. यावेळी सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजपा कोकण विकास आघाडीप्रमुख संजय यादवराव, माजी आमदार अॅड. अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, विजयदुर्ग सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत जाधव, हनुमंतराव सावंत, डॉ. यश वेलणकर, राजेंद्र परूळेकर, विजयदुर्ग सरपंच शीतल पडेलकर, उपसरपंच महेश बिडये, भाऊ सामंत, नीतीन गावकर, बबलु सावंत, संदीप बांदिवडेकर, महेश खोत, नरेंद्र भाबल, दिलीप गिरकर, संतोष गिरकर, प्रदीप साखरकर, भाई आडीवरेकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोहीत महाडीक, रवींद्र तिर्लोटकर, संजय नकाशे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे म्हणाले, येत्या काही दिवसातच मिनी तारांगणाचे काम सुरू होवून ते वर्षभरात पूर्ण होईल. विज्ञानकेंद्राचे काम तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे येथील विद्यार्थ्यांना, नागरिकांना, खगोलप्रेमींना आकाशातील ताऱ्यांचा अभ्यास करण्याची संधी प्राप्त होणार आहे. ऐतिहासिक विजयदुर्ग गावाचे नाव या विजयदुर्ग किल्ल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात गेले आहे. तर विज्ञान केंद्रामुळे आता विजयदुर्गचे नाव जगाच्या नकाशावर झळकणार आहे.
विजयदुर्ग आगार ते विजयदुर्ग किल्ला अशी ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विजयदुर्गवासीय जनता, विजयदुर्ग व गिर्ये हायस्कूलचे विद्यार्थी तसेच विज्ञान प्रेमी व ग्रामस्थ, भाजपाचे देवगड तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खगोलप्रेमी, गिर्ये, विजयदुर्ग शाळेतील विद्यार्थी शिक्षकवर्ग व सिंंधुभूमी फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. किल्ल्यावर साहेबाचे ओटे या ठिकाणी मान्यवरांनी पुष्प अर्पण केले. त्यानंतर हवेत फुगे सोडून हेलियम डे साजरा करण्यात आला. ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ या घोषणांनी किल्ला परिसर दुमदुमून गेला. यावेळी विजयदुर्ग हायस्कूलचे शिक्षक निलेश मेस्त्री व सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेत मरण पावलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)
विजयदुर्ग येथील विज्ञानकेंद्र : दीड कोटीचा निधी मंजूर
यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे म्हणाले, हेलियम वायू हा जगातील दोन नंबरचा वायू असून उत्कृष्ट माणूस कसा असावा हे हेलियम वायूच्या माध्यमातूनच बोध घेण्यासारखे आहे. उत्कृष्ट माणूस घडविण्याचे काम हा वायू करीत आहे. हेलियम वायू मनुष्याचे अस्तित्व घडविण्याचे काम करीत आहे. विजयदुर्ग येथे विज्ञानकेंद्र उभारण्यात येत असून यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनामार्फत १.५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील २५ लाख रूपयांचा धनादेश विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडे अदा करण्यात आला आहे.
विजयदुर्गच्या पर्यटनामध्ये भर पडणार
संजय यादवराव म्हणाले, पर्यटनाच्या माध्यमातून विजयदुर्गचा विकास झाला पाहिजे. येथील अनेक पर्यटनस्थळे निसर्गसौंदर्याने बहरली असून विजयदुर्ग किल्ल्याच्या सभोवती विशाल असा समुद्र आहे. टुरिझमच्या माध्यमातून याठिकाणी विकास केला पाहिजे. विज्ञान संशोधन केंद्रामुळे विजयदुर्गच्या पर्यटनामध्ये भर पडणार आहे.