‘हिम्बज्’ची व्याप्ती वाढणार
By admin | Published: January 22, 2015 11:22 PM2015-01-22T23:22:13+5:302015-01-23T00:45:57+5:30
सावंतवाडीत ५५ तक्रारी : १२ आरोपींना न्यायालयीन कोठडी
सावंतवाडी : सिंधुदुर्गसह अख्ख्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या हिम्बज् हॉलिडेज प्रकरणी सावंतवाडी पोलिसात पंचावन्न ठेवीदारांच्या तक्रारी दाखल झाल्या असून, जिल्ह्यात आणखी काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता असल्याने आता या गुन्ह्याची व्याप्ती मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातही वाढली आहे. दरम्यान, गुरुवारी हिम्बज्च्या संचालकांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ठेवीदारांनी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांची भेट घेऊन तपासाबाबत माहिती घेतली. हिम्बज्च्या संचालकाना मुंबई पोलिसांकडून सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, आता या गुन्ह्याची व्याप्ती मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातही वाढत असल्याने इचलकरंजी पोलीसही या आरोपींना ताब्यात घेणार आहेत. तसा अर्ज मुंबईतील न्यायालयात केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आठवड्यापूर्वी हिम्बज्च्या संचालकांना सावंतवाडी पोलिसांनी मुंबई आर्थिक गुन्हा अन्वेषणकडून ताब्यात घेतले होते. यामध्ये बारा जणांचा समावेश होता. मूळ सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. सावंतवाडीत आणलेल्या मंगेश मधुकर शेर्लेकर (वय ३७, रा. साळगाव, कुडाळ), दिनेश बळवंत सकपाळ (वय ३७, रा. परेल- मुंबई), संतोष तुकाराम काजरोळकर (वय ४२, रा. भार्इंदर- ठाणे), राजन मच्छिंद्र चाकणे (वय ३४, रा. शिवडी-मुंबई), गरुनाथ जनार्दन सावंत (वय३३, रा. तुळसुली, कुडाळ), गणेश बाळू शिंदे (वय ३३, रा. परेल-मुंबई), किरण सुधाकर आरेकर (वय ३०, रा. मुरगवाडी-रत्नागिरी), युवराज साताप्पा पाटील (वय ३२, रा. लालबाग-मुंबई), महेश दत्ताराम पालकर (वय ३५, रा. करवाचीवाडी, रत्नागिरी), प्रभाकर धाकरोबा दळवी (वय ३७, रा. देऊळवाड-रत्नागिरी), यमचंद्र नारायण बनसोडे (वय ३४, रा. रत्नागिरी), आरिफ अमीनुद्दिन मर्चंट (वय ४०, रा. रसपूर- मुंबई) या सर्व आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली. (प्रतिनिधी)
तपास गुन्हा अन्वेषणकडे वर्ग करणार
हिम्बज् हॉलिडे प्रकरणात सावंतवाडी पोलिसांकडे यापूर्वी एकच तक्रार दाखल झाली होती. मात्र, गेल्या सात दिवसात पंचावन्न तक्रारी दाखल झाल्या असून, या गुन्ह्याची व्याप्तीही वाढू लागली. या तक्रारीमध्ये जिल्ह्यातीलही काही तक्रारी आहेत. तसेच कुडाळ पोलिसांकडे काही तक्रारदारांनी अर्ज केले आहेत. तसेच इचलकरंजी पोलीसही आरोपींना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता हा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग होण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.
ठेवीदार न्यायालय परिसरात उपस्थित
या सर्व आरोपींना गुरूवारी न्यायालयात हजर केले. संशयिताच्या बाजूने अॅड. शोएब डिंगणकर यांनी बाजू मांडली. संचालकांनी पैसे कुठे गुंतवले, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, सरकारी पक्षाची बाजू धुडकावून लावत सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी मोठ्या प्रमाणात हिम्बज्चे ठेवीदार न्यायालय परिसरात उपस्थित होते.