कणकवलीत भंगार साहित्याला आग, नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे आणली आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 16:24 IST2021-01-26T16:22:25+5:302021-01-26T16:24:20+5:30
Kankavli Fire News : नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाला पाचारण करण्यात आले. या बंबाच्या साहायाने आग आटोक्यात आणण्यात आली.

कणकवलीत भंगार साहित्याला आग, नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे आणली आटोक्यात
कणकवली - कणकवली शहरातील तेलीआळी येथून हॉटेल सह्याद्रीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या अंबाजी सुभरावर इंगळे यांच्या घरासमोरील भंगार सामानाला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीच्या घटनेची माहीती मिळताच नगराध्यक्ष समीर नलावडे , उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजित मुसळे, संजय कामतेकर, शिशिर परुळेकर, प्रदीप मांजरेकर, रुपेश नार्वेकर, राजू गवाणकर, गौरव हर्णे, मिथुन ठाणेकर, महेश कोदे, संकेत नाईक तसेच इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाला पाचारण करण्यात आले. या बंबाच्या साहायाने आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान संबधित आग रस्त्यालगत असलेल्या भंगार सामानाच्या बाजूला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाला लागून सर्वत्र पसरत होती. या भंगार साहित्यातील डांबराचे बॅरल, फ्रीज व अन्य इलेक्ट्रिक वस्तूंमुळे आगीची तीव्रता वाढत होती. या आगीमुळे त्या परिसरातील एका झाडानेही पेट घेतला. मात्र, पाण्याच्या सहाय्याने ती आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीच्या घटनेमुळे शहरातील वाढत्या अग्नितांडवाची चर्चा पुन्हा एकदा ठिकठिकाणी रंगली आहे. तसेच नेहमीच गजबजलेल्या कणकवली शहरात अद्ययावत अग्निशामक दल असण्याची बाब प्रामुख्याने समोर येत आहे.