स्कुबा डायव्हींगला ‘पॅडी’ची मान्यता
By admin | Published: January 20, 2015 11:15 PM2015-01-20T23:15:29+5:302015-01-20T23:50:55+5:30
तारकर्ली जगाच्या नकाशावर : आशिया खंडातील पहिलाच प्रकल्प
संदीप बोडवे - मालवण -सिंधुदुर्गच्या किंबहुना देशाच्या पर्यटनात ‘निलक्रांती’ घडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथे उभारलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्युट आॅफ स्कुबा डायव्हींग अॅण्ड अॅक्वाटीक स्पोर्टस’ या स्कुबा डायव्हींग सेंटरला आजअखेर ‘पॅडी’ या संस्थेची मान्यता मिळाली आहे. हा प्रकल्प जगाच्या नकाशावर आला असून आशिया खंडातील तो एकमेव प्रकल्प आहे.
‘पॅडी’चे एशिया पॅसिफिकचे विभागीय व्यवस्थापक अॅन्ड्रेस अवूर यांनी आॅक्टोबरमध्ये स्कुबा डायव्हींग सेंटरला भेट देऊन निकषांची तपासणी केली होती. आंतरराष्ट्रीय मानकानुसार सर्व निकष पूर्ण केल्यानंतर येथील स्कुबा डायव्हींग सेंटरला ‘पॅडी’ची मान्यता मिळाली आहे. या संस्थेशी संलग्न राहून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथील स्कुबा डायव्हींग प्रकल्प हाती घेतला आहे. या संस्थेच्या अटी, शर्थी व मानांकनानुसार स्कुबा डायव्हींग प्रकल्प उभारण्यात आला आहे.
हा आशिया खंडातील एकमेव प्रकल्प आहे. या सेंटरची तपासणी करण्यासाठी पॅडीच्यावतीने अॅन्ड्रेस अवूर यांनी भेट दिली होती. यावेळी अवूर यांनी आंतरराष्ट्रीय निकषांनुसार स्कुबा डायव्हींग सेंटरची कसून तपासणी केली होती.
या सेंटरला ‘पॅडी’ची मान्यता मिळण्यास काहीच हरकत नाही, असा विश्वास निरीक्षक अॅन्ड्रेस अवूर यांनी व्यक्त केला होता. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथे साकारलेल्या ‘आयआयएसडीए’ (इसदा) अर्थात स्कुबा डायव्हींग सेंटरच्या आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या सर्व अटी व निकष य
ा प्रकल्पाने पूर्ण केल्या आहेत.
पॅडी म्हणजे काय... प्रोफेशनल असोसिएशन आॅफ डायव्हींग इन्स्ट्रक्टर्स (पॅडी) ही आॅस्ट्रेलियातील स्कुबा डायव्हिंग सेंटर्सचे मानके निश्चित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जगभरात १८० पेक्षा जास्त देशांमध्ये ‘पॅडी’ची डायव्हींग सेंटर आहेत.
असे आहे सेंटर
४तारकर्ली येथील या डायव्हिंग सेंंटरमध्ये १० मीटर खोलीचा स्विमिंग टँक, प्रशस्त व अद्ययावत क्लासरूम, संगणकीय लॅब, चेंजिंग रूम, आॅक्सिजन युनिट, फिल्टरेशन युनिट यांचा समावेश आहे. याशिवाय अमेरिकन बनावटीच्या तीन स्पीड बोटींचाही समावेश यात आहे.
जगातील स्कुबा डायव्हिंग सेंंटरला मान्यता देणाऱ्या पॅडी संस्थेने तारकर्लीच्या सेंटरला मान्यता दिली हे देशाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. याचा लाभ घेणाऱ्यास आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळेल.
- सुबोध किन्हळेकर,
व्यवस्थापक, साहसी क्रीडा विभाग,
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई.
गेल्या कित्येक वर्षांच्या मेहनतीचे फळ आम्हाला मिळालेले आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जगाच्या नकाशावर येत आहे.
- डॉ. सारंग कुलकर्णी, जनरल मॅनेजर अॅन्ड चीफ इन्स्ट्रक्टर, इसदा, तारकर्ली