समुद्र स्फोट;भविष्यातील भूकंपाचे संकेत--गूढ उकलण्याचे आव्हान
By admin | Published: April 27, 2016 10:09 PM2016-04-27T22:09:25+5:302016-04-27T23:22:08+5:30
एम. के. प्रभू यांचा इशारा : स्फोटांच्या नोंदी भूकंपमापन केंद्राकडेही नाहीत, नौदल युध्दनौकांच्या कसरती सुरू
अनंत जाधव -- सावंतवाडी --समुद्रात वारंवार होणाऱ्या स्फोटांच्या आवाजाने सर्वत्र खळबळ उडाली असून, या स्फोटांचे नेमके कारण स्पष्ट होत नाहीत. हे छोटे-छोटे स्फोट भविष्यातील मोठ्या भूकंपाची नांदी असल्याचे मत भूगर्भशास्त्रज्ञ एम. के. प्रभू यांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे खोल समुद्रात होणाऱ्या स्फोटांची नोंद भूकंपमापन केंद्राकडे नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे हे स्फोट नेमके कशाचे, याचा अंदाज बाळगणे प्रशासनालाही कठीण बनले आहे. दरम्यान, सिंधुदुर्गच्या समुद्रात गेल्या काही दिवसांपासून नौदलाची युध्दनौका असून, त्यांच्या कसरतीही सुरू असल्याने त्यांच्या तोफगोळ्यांचे आवाज असू शकतात, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.सिंधुदुर्गच्या समुद्रात आचरा, मालवण, वेंगुर्ले येथे मोठमोठे स्फोटांचे आवाज झाले. या आवाजाचे गूढ अद्याप उलगडले नाही. या आवाजाने किनारपट्टीही सरकत चालली असल्याचे मच्छिमार सांगतात. मात्र, प्रत्यक्षात जिल्हा प्रशासन हे आवाज भूकंपाचे असल्याचे मानण्यास तयार नाही. मंगळवारी सकाळीही वेंगुर्ले, रेडी निवती आदी ठिकाणी मोठमोठे स्फोट झाले. त्यामुळे मच्छिमार हादरून गेले आहेत. मच्छिमारांच्या मनात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. पण ही भीती असणे स्वाभाविकच आहे, असे भूगर्भशास्त्र एम. के. प्रभू यांनी सांगितले.समुद्रात सतत स्फोटांचे आवाज येणे म्हणजे भविष्यातील भूकंप होण्याचे हे संकेत असून, मोठा भूकंप होणार आहे आणि या परिस्थतीला तोंड देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. मुख्यत: मच्छिमारांना सावध केले पाहिजे. मोठमोठ्या महासागरांमध्ये स्फोटांचे आवाज नेहमीच होत असतात. पण आपल्यासाठी हे आवाज नवीन आहेत. कारण समुद्राची जमीन सरकू लागली की असे प्रकार घडतात. पाण्याचे स्फोट होत असतात, असे प्रभू म्हणाले. पण या प्रकाराला आपण भूकंप म्हणू शकत नसल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
तर दुसरीकडे कोयनानगर तसेच कोल्हापूर येथील भूकंपमापन केंद्राच्या रडारवर कोणत्याही प्रकारे भूकंपाची नोंद झाली नसून, समुद्राच्या भूगर्भातून एखादा मोठा स्फोट झाला, तर त्याची नोंदही भूकंपाएवढीच महत्त्वाची असते. तशी नोंद भूकंपमापन केंद्रात होत असते. पण गेल्या महिनाभरात एकही नोंद एकाही केंद्रात झाली नाही, असे कोयना धरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. छोट्या भूकंपाचे हादरे बसले, तरी भूकंपाच्या नोंदी केंद्रात पाहायला मिळतात. पण तशा नोंदी नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, सिंधुदुर्गच्या समुद्रात कस्टम्सच्या हद्दीबाहेर खोल समुद्रात नौदलाची एक युध्दनौका आली असून, ती समुद्रात सध्या विविध कसरती करीत आहे. त्यातूनच या कसरती करीत असतानाच तोफगोळ्यांसह इतर दारूसामानाचा वापर केल्यास त्याचेही मोठमोठे आवाज समुद्रातून येऊ शकतात, ही बाब नाकारता येणार नाही. तसेच हे आवाज लांब लांबपर्यंत येऊ शकतात. त्याचे समुद्रातील अंतर स्पष्ट करता येणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. समुद्रात सतत घडणाऱ्या या स्फोटांमुळे प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. मात्र, स्फोटांमागचे कारण समजत नाही. सिंधुदुर्गमध्ये मालवण, वेंगुर्ले तसेच रेडी, वेळागर, आचरा, आरवली, निवती आदी ठिकाणी स्फोटांचे मोठे आवाज झाल्याने या स्फोटांना केंद्रबिंदू नसल्याचे स्पष्ट होत आहे.
डी.ए.बागडे : समुद्रातील आवाजाबाबत कोणतीही नोंद नाही
समुद्रातून होणाऱ्या मोठ्या आवाजांबाबत कोयनानगर येथील भूमापन केंद्राशी संपर्क साधला असता, समुद्रातील आवाजांबाबत अशी कोणतीही नोंद आमच्याकडे तसेच कोल्हापूर येथील भूमापन केंद्रात नसल्याचे कोयनानगर धरण व्यवस्थापक डी. ए. बागडे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसात सिंधुदुर्गमध्ये मोठा भूकंपच झाला नाही. आम्ही प्रत्येक आवाजाची नोंद करीत असतो, असेही बागडे यांनी स्पष्ट केले.
...मग मच्छिमार समुद्रात कसे ?
या आवाजांमागे एक कारण नौदलाच्या खोल समुद्रात होणाऱ्या कवायती असे मानले जाते. पण याला अद्याप दुजोरा मिळत नसला, तरी समुद्रात मोठ्या मच्छीमार ट्रालर्स जात येत असतात. मग नौदलाच्या कवायती सुरू असत्या, तर त्यांनाही मज्जाव करण्यात आला असता. पण तसे झाले नसल्याने समुद्रातील स्फोट हा संशोधनाचा विषय बनला आहे.
भूकंप म्हणता येणार नाही
समुद्रातून होणाऱ्या मोठ्या आवाजांना भूकंप म्हणता येणार नाही. पण भविष्यातील भूकंपाची ही नांदी असू शकते. मोठमोठ्या महासागरात मोठे आवाज होतच असतात. पण आपल्यासाठी ही बाब नवीन आहे. त्यामुळे याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शासकीय यंत्रणेने कामाला लागणे आवश्यक आहे.
- एम.के. प्रभू, भूगर्भ शास्त्रज्ञ
गूढ उकलण्याचे आव्हान
प्रथमेश गुरव-- वेंगुर्ले
वेंगुर्ले,आरवली, शिरोडा, रेडी, मोचेमाड, वायंगणी आणि निवती या समुद्र किनारी भागात मंगळवारी पुन्हा स्फोटसदृश आवाज झाले. तिनवेळा असा प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून प्रशासन मात्र ढिम्मपणे बसून आहे. केवळ विचारणा आणि चौकशी करण्यापेक्षा कोणतीही अधिकची प्रशासनाकडून हालचाल झालेली दिसत नाही. परिणामी या आवाजांचे गूढ वाढत असून मच्छिमार, ग्रामस्थांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. त्यामुळे या आवाजाचे गूढ उकलण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून समुद्र किनारी होणाऱ्या स्फोटसदृश आवाजाचे गूढ उकलण्यात संबंधित शासकीय यंत्रणेला यश आलेले नाही. आतापर्यंत समुद्रात ऐकू आलेले आवाज हे एका विशिष्ट वेळेतच, म्हणजे सकाळी ११ ते १२ या वेळेतच होत असल्याचे ऐकीवात आहे. त्यानंतर संपूर्ण दिवस कोणतीही हालचाल नाही. अशा स्फोटसदृश आवाजांमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान दिसून येत नसल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. स्फोट किंवा त्सुनामीसारख्या घटनांमुळे समुदात मोठी उलथापालथ होऊन समुद्रातील जीव किंवा मासे, खेकडे किनाऱ्याकडे धाव घेतात किंवा किनाऱ्यावर मरून पडतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, तशाप्रकारचे कोणतेही परिणाम सुद्धा समुद्र किनारी दिसून येत नसल्याचे जाणवत आहे. त्यामुळे या आवाजाची गुढता वाढली आहे. परिणामी मच्छीमारांमध्ये एक अनामिक भिती संचारली आहे.
यामुळे गूढ आवाजाने भयभीत झालेल्या नागरिक, मच्छीमारांनी समुद्रकिनारी एकच गर्दी केली होती. पण आवाजाबाबत कुणालाच काही कळले नाही. मंगळवारी झालेल्या आवाजांनतर वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी, नायब तहसीलदार सुरेश नाईक, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक रतनसिंग रजपूत, निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जानकर यांनी वायंगणी व निवती किनारी भेट घेऊन किनारपट्टीची पाहणी करून तेथील मच्छिमारांशी चर्चा केली. मात्र हे आवाज कशामुळे होत आहेत, याचा थांगपत्ता अद्याप शासकीय यंत्रणेला न लागल्याने प्रशासनाच्या ढिम्मपणावर प्रकाशझोत पडला.
मच्छिमारांमध्ये तर्कवितर्क
किनारपट्टीवर भीती
यासंबंधीची अधिकृत माहिती जोपर्यंत शासकीय यंत्रणा देत नाही किंवा याबाबतचे परिणाम किनारपट्टी भागात जाणवत नाहीत, तोपर्यंत नागरिक व मच्छिमारांमधील संभ्रम कायम राहणार आहे. या आवाजांमुळे किनारपट्टी भागातील मच्छिमार व नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
वास्तविक पाहता मागे झालेल्या दोन्ही आवाजावेळीच यावर निरीक्षण ठेवणे गरजेचे होते. मात्र, तसे न झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
या आवाजाबाबत मात्र नेहमीप्रमाणे स्फोट, भूकंप, त्सुनामी आदीं तर्कवितर्क वर्तविण्यात येत होत होते. या आवाजांविषयी नागरिक व मच्छिमारांमध्ये अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
पण प्रशासनाने याबाबत सतर्कता दाखविण्यात कमालीची दिरंगाई केली आहे. केवळ पाहणीचा फार्स केला जात आहे.