पाणीटंचाईमुळे ‘सागर बंगला’ बंद ::
By admin | Published: May 3, 2016 09:55 PM2016-05-03T21:55:40+5:302016-05-04T00:33:21+5:30
पर्यटकांचे आकर्षण : वेंगुर्ले नगरपरिषदेने पाण्याची व्यवस्था करावी
वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरातील बंदरावरील सागर बंगला म्हणजेच शासकीय विश्रामगृह हे पर्यटकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. देशातील प्रतिष्ठित व्यक्ती या बंगल्यावर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येतात. सध्या पाणीटंचाई या एका कारणास्तव वेंगुर्लेतील हा बंगला गेल्या महिन्यात पूर्णत: बंद राहिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने व वेंगुर्ले नगरपरिषदेने पाण्याची व्यवस्था करून हा बंगला कायमस्वरूपी सुरू ठेवणे गरजेचे आहे.
वेंगुर्ले शहरापासून अवघ्या एक-दीड किलोमीटर अंतरावर हा बंगला उभा आहे. वेंगुर्ले शहरातून गाडी सरळ बंदराच्या दिशेने निघाली की ज्या ठिकाणी गाडी थांबवून पार्किंग करावी लागते, त्या ठिकाणावर उभे राहून वर नजर टाकली की हा सागर बंगला दृष्टीस पडतो. तेथे गेलेल्या प्रत्येकाला तेथे जाण्याची ओढ निर्माण होते. रस्त्यावरून सुरू होणाऱ्या पायऱ्या चढत चढत जेव्हा आपण त्या बंगल्यासमोर पोहोचतो, तेव्हा आपल्याला विशाल समुद्र दृष्टीस पडतो. त्याच्या एका बाजूला पाहिले तर पुन्हा वरवर जाणाऱ्या पायऱ्या दिसून येतात, ती वाट जाते थेट वेंगुर्लेच्या दीपगृहाकडे. आल्या रस्त्याकडे पाठमोरे होऊन जर आपण मागे पाहिले तर सुंदर अशी वेंगुर्लेची खाडी व बंदर जेटी पाहावयास मिळते. त्या बंदरामध्ये नांगरून ठेवलेल्या मच्छिमारांच्या बोटींचे दर्शनही विलोभनीय असते. उंचावर, एकाच ठिकाणावरून सकाळी सूर्यदर्शन व सायंकाळी सूर्यास्त पाहण्याची संधी याठिकाणी मिळते. मात्र, सध्या उष्म्याचे प्रमाण वाढल्याने नगरपरिषदेकडून येणारे दोन दिवसाआड पाणी ठेवून विश्रामगृह चालवणे शक्य नसल्याचे कारण पुढे करून सार्वजनिक बांधकाम विभागाने एक-दोन दिवसांपासून नव्हे, तर गेल्या महिन्यापासून हे विश्रामगृह म्हणजेच सागर बंगला बंद ठेवला आहे. सागर बंगला शेवटच्या टोकाला असल्याने तिथपर्यंत पाणी सुरळीत होत नाही. सागर बंगल्यावर बुकिंग करून पाहुणे आले तर पाणीप्रश्न निर्माण होईल म्हणून बांध
काम विभागाने हा सागर बंगला सध्या बंद ठेवला आहे. परिणामी, पर्यटकांमधून व वेंगुर्लेवासीयांमधून याबाबत नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करून हा सागर बंगला सुरू करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)