देवबागमध्ये सागरी अतिक्रमणाने थरकाप
By admin | Published: June 17, 2014 12:52 AM2014-06-17T00:52:16+5:302014-06-17T01:17:15+5:30
प्रशासनाकडून ग्रामस्थांना स्थलांतराच्या सूचना
मालवण : गेले आठ दिवस मालवण किनारपट्टीवर समुद्राला उधाण असून, देवबाग गावाला आजही सागराच्या अजस्र लाटांनी घेरले. सुमारे अडीच मीटर उंचीच्या लाटांनी देवबागात प्रवेश केल्याने देवबागवासीयांचा थरकाप उडाला. आज सोमवारच्या सागरी अतिक्रमणात देवबागवासीयांचे माड जमीनदोस्त झाले, तर सागराच्या महाकाय लाटांनी देवबाग भाजीवाडी येथील दगडी बंधारा उद्ध्वस्त करून टाकला.
आज दुपारी मालवणच्या तहसीलदार वनीता पाटील यांनी देवबाग गावाची पाहणी करून सागरी अतिक्रमणग्रस्त देवबागवासीयांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या सूचनांचा कोणताही परिणाम देवबागवासीयांवर झाला नाही.
आज पावसाने दिवसभर विश्रांती घेतली असली तरी (पान १ वरून) दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास देवबागच्या समुद्रात उधाण निर्माण झाले. सुमारे अडीच मीटर उंचीच्या महाकाय लाटांनी तांडवनृत्य केले. देवबाग मधलीवाडी येथे फ्रान्सीस जुनाव सोझ यांच्या मालकीचे माड सागराच्या लाटांनी जमीनदोस्त केले. भाजीवाडीतील जवळपास ५० ते ७५ फूट जमीन सागराने आपल्या पोटात घेतली आहे. भाजीवाडी येथील स्वप्निल साळगांवकर यांच्या हॉटेललाही सागराच्या लाटांनी आजही घेरले होते. भाजीवाडीतील शासनाने घातलेला संरक्षक बंधारा समुद्राने उद्ध्वस्त केला आहे. या लाटांनी बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे. देवबाग येथील संतोष नेवाळकर यांच्या घरात लाटांचे पाणी घुसले.
स्थलांतराच्या सूचना
मालवणच्या तहसीलदार वनीता पाटील यांनी देवबागची पाहणी केली. य्तहसीलदारांनी पं. समितीचे सदस्य देवानंद चिंदरकर यांच्याशी चर्चा केली. पाटील यांनी देवबागवासीयांना स्थलांतराच्या सूचना केली असता ग्रामस्थ आमचे ऐकत नसल्याचे सांगितले. त्यावर तहसीलदारांनी स्थलांतरासाठी लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांची मने वळविली पाहिजेत, असे सांगून जर उद्या काही विपरित घडले तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)