अरबी समुद्रात हिक्का वादळाची निर्मिती, 12 तास समुद्र खवळलेला राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 04:02 PM2019-09-24T16:02:39+5:302019-09-24T16:06:10+5:30
अरबी समुद्राच्या मध्यभागी हिक्का या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. सध्या या वादळाची दिशा उत्तर व वायव्य दिशेने आहे. यामुळे समुद्रामध्ये वेगाने वारे वाहणार आहेत. या वादळाचा वेग ताशी 21 किलो मीटर प्रति तास असून या वेगाने हे वादळ कराची, पाकिस्तान व ओमानचे आखात या दिशेने सरकत आहे.
सिंधुदुर्ग - अरबी समुद्राच्या मध्यभागी हिक्का या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. सध्या या वादळाची दिशा उत्तर व वायव्य दिशेने आहे. यामुळे समुद्रामध्ये वेगाने वारे वाहणार आहेत. या वादळाचा वेग ताशी 21 किलो मीटर प्रति तास असून या वेगाने हे वादळ कराची, पाकिस्तान व ओमानचे आखात या दिशेने सरकत आहे.
25 सप्टेंबर 2019 रोजी पर्यंत हे वादळ अरबी समुद्रात राहणार असल्याची सूचना भारतीय हवामान खात्याने दिली आहे. या चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग सुमारे 110 ते 120 किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे. तसेच उद्या दिनांक 25 सप्टेंबर रोजी या वाऱ्याचा वेग सुमारे 150 ते 165 कि.मी प्रतितास पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. हे वादळ हळुहळु ओमानच्या आखातामध्ये जाऊन संपेल असे हवामान विभागाने कळविले आहे.
पुढील 12 तास समुद्र खवळलेला राहणार आहे. तरी या अनुषंगाने किनारपट्टीवरील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे कळविण्यात आले आहे.