शोधमोहीम मंदावली
By admin | Published: August 7, 2016 11:20 PM2016-08-07T23:20:21+5:302016-08-07T23:20:21+5:30
सावित्री पूल दुर्घटना : वाहनांचाही तपास नाही; १५ प्रवासी अद्यापही बेपत्ता
महाड : सावित्री पूल दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ४२ प्रवाशांपैकी २७ प्रवाशांचे मृतदेह नदी किनाऱ्यावर सापडले असून यापैकी १५ बेपत्ता प्रवाशांचा शोध लागला नसल्याने शोधकार्यात गेल्या पाच दिवसांपासून गुंतलेली यंत्रणा चक्रावून गेली आहे. या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या दोन एसटी बसेसह एका तवेरा जीपचा छडा अद्यापही लागला नाही. या वाहनांचा शोध घेण्यासाठी सोनार तंत्रज्ञानाचाही गेल्या दोन दिवसांपासून वापर केला जात असून या अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात असूनही या शोधपथकाला या वाहनांचा वेध घेता येणे अशक्य झाल्याचे दिसून येत आहे.
नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या एसटी बसचा महिलांसाठी आरक्षित हा लोखंडी पत्र्याचा फलक, घटनास्थळापासून तीन ते चार किती अंतरावरील विसावा हॉटेलच्या मागील बाजूस शनिवारी सापडला तर बसच्या सिटचा भागदेखील वराठी जवळ पाण्यात वाहून जाताना सापडला. रविवारी दिनेश सखाराम कांबळे, रमेश सखाराम मिरगल, अविनाश सखाराम मालप, जयेश गोपाळ बने हे चार मृतदेह वहूर आंबेत, वेश्वी ओवळे अशा विविध किनाऱ्यावर आढळून आले. स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमारांनी हे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून प्रशासनाच्या ताब्यात दिले.
मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये किंवा नोकरी : दिवाकर रावते
अडरे : एस.टी.तील कर्मचारी व एस.टी. प्रशासन यांच्यात माझे भावनिक नाते निर्माण करण्याचा आपला प्रयत्न राहील. महामंडळ पुढे न्यायचे असेल तर कर्मचारी आणि प्रशासन हातात हात घालून चालले पाहिजेत. त्यासाठी भावनिक नाते असणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड राजेवाडी येथील पूल कोसळल्याने दोन एस. टी. वाहून गेल्या. या दुर्दैवी घटनेत वाहून गेलेल्या श्रीकांत कांबळे, महेंद्र कांबळे, प्रभाकर शिर्के यांचे मृतदेह सापडले. त्यांना श्रद्धांजली वाहताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, हा अपघात जरी असला तरी अशी दुर्घटना घडते, ही एस. टी. महामंडळाचे दुर्दैव आहे. या घटनेत मृत्यू आलेल्यांना १० लाख रुपये किंवा अनुकंपाखाली नोकरी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
रविवारी सकाळी ९.३० वाजता परिवहन मंत्री रावते यांनी चिपळूण आगाराला भेट दिली. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, माथाडी कामगार संघटनेचे सुधीर पालांडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, नगरसेवक शशिकांत मोदी, राजू देवळेकर, राकेश शिंदे, राजू भागवत, नित्यानंद भागवत, भैय्या कदम, महेंद्र डिगे, संतोष महाडिक, संदेश आयरे, आगार व्यवस्थापक रमेश शिलेवंत, एस. टी. कामगार संघटनेचे रवी लवेकर, संजय रसाळ, सुनील सावंतदेसाई, शेषनाथ घाग, प्रकाश बल्लाळ, शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेचे शैलेंद्र सुर्वे, सुनील गमरे, मुन्ना कदम, प्रमोद नलावडे व एस.टी.तील कामगार उपस्थित होते.
परिवहन मंत्री रावते यांनी एस. टी. महामंडळाला भेट दिल्यानंतर काविळतळी येथील मृत पावलेल्या आसिफ चौगुले व आवेश चौगुले यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.