ओहोळात बुडालेल्या युवकाचा शोध सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:01 AM2019-07-15T00:01:40+5:302019-07-15T00:01:45+5:30
तळेरे : शनिवारी सकाळी १० वाजता अंघोळीसाठी गेलेला युवक राहुल पाटील ३२ तास होऊनही सापडला नाही. शोधमोहीम राबवूनही अद्याप ...
तळेरे : शनिवारी सकाळी १० वाजता अंघोळीसाठी गेलेला युवक राहुल पाटील ३२ तास होऊनही सापडला नाही. शोधमोहीम राबवूनही अद्याप सापडला नसल्याने नातेवाईक व मित्रमंडळी हतबल झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी शोधमोहीम संपल्यावर रविवारी सकाळी कोल्हापूर जीवरक्षक, सिंधुदुर्ग मालवण आपत्कालीन विभागाने शर्थीचे प्रयत्न करूनही अद्याप सापडलेला नाही.
शनिवारी सकाळी आपल्या मित्रांसमवेत कासार्डे पोखरबांव ओहोळात अंघोळीसाठी गेलेला राहुल पाटील (वय २५, रा. सध्या कासार्डे नागसावंतवाडी, मूळ रा. मोहडे, ता. राधानगरी) हा युवक बुडाल्यानंतर शनिवारी सायंकाळी शोधमोहीम राबवूनही सापडला नव्हता. तो बुडाल्याची माहिती मिळताच त्याच्या गावातील मित्रमंडळी व नातेवाइकांनी बुडालेल्या ठिकाणी एकच गर्दी केली होती.
रविवारी सकाळी कोल्हापूरचे जीवरक्षक दिनकर कांबळे व त्यांचा साथीदार यांनी सकाळी ९.३० वा. बुडालेले ठिकाण ते नागसावंतवाडी खांडसरी पुलापर्यंत पाण्याच्या प्रवाहात उतरून सायंकाळी चार वाजेपर्यंत शोधकार्य केले. मात्र, राहुल पाटील याचा पत्ता लागलेला नाही. यानंतर सायंकाळी पाच वाजता आपत्कालीन विभाग मालवण स्कुबा डायव्हिंगचे दामोदर तोडणकर, आजिम मुजावर, योगेश मेस्त्री,आसिफ मुजावर ही टीम दाखल झाली. त्यांनी खोलवर जाऊन तब्बल दीड तास शोध घेतला. मात्र, त्यांनाही काहीही सापडले नाही. यानंतर काळोख पडत असल्याने सायंकाळी शोधमोहीम थांबवण्यात आली.
यावेळी तहसीलदार आर. जे. पवार, नायब तहसीलदार आर. एन. कडूलकर, मंडळ अधिकारी एम. एस. यादव, कासार्डेचे तलाठी एस. बी. जाधव, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, पोलीसपाटील महेंद्र देवरुखकर, पोलीस शिपाई शिरीष कांबळे यांच्यासह स्थानिक नागरिक,नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होती.