मार्चमध्ये आंबा पिकाचा हंगाम
By admin | Published: February 1, 2016 12:34 AM2016-02-01T00:34:01+5:302016-02-01T00:34:01+5:30
थंडी वाढल्याने पोषक वातावरण : मोहोरावर औषध फवारणी अंतिम टप्प्यात
विनायक वारंग ल्ल वेंगुर्ले
कोकणात सर्वत्र आंब्याच्या झाडांना चांगलाच मोहोर आला असून सध्या आंबा पिकावरील औषध फवारणी शेवटच्या टप्प्यात आहे. यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी असल्याने आंंबा पिकाला हे वातावरण पोषक ठरल्याचे चित्र आहे. मात्र, काही भागात तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून आंबा पिकाचा हंगाम सुरु होण्याची शक्यता आहे.
कोकणचा राजा हापूस अवघ्या काही दिवसात ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. सध्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आंबा पिकावर सुरु केलेली औषध फवारणी शेवटच्या टप्प्यात असून त्याला थंडीची चांगली साथ मिळाली तसेच थंडीमध्ये बऱ्यापैकी सातत्य असल्याने सर्वत्र चांगल्याप्रकारे आंबा झाडांना मोेहोर आला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत आत्ताचे चित्र सध्या तरी चांगले आहे. जानेवारी महिन्यात आंबा शेतकऱ्यांच्या बागेत काही ठिकाणी वाटाण्या एवढ्या फळांची तर काही ठिकाणी सुपारी एवढ्या फळांनी आकार घेतला आहे. आता थंडीचा ओघ कमी होऊन हळुहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होणार आहे. हवामानातील बदल नैसर्गिकरित्या झाल्यास यंदा आंबा पिक चांगले होण्याची शक्यता आहे.
साधारणत: मार्च महिन्यात बऱ्यापैकी आंबा हंगामाला सुरुवात होईल असे चित्र आहे. काही बागांमध्ये तुडतुडा या आंबा पिकावरील किडीचा प्रादुर्भाव होत असून त्यासाठी आंबा शेतकरी आणखीन एक किंवा दोन फवारण्या घेतील.
असे असले तरी ज्या ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव नाही अशा बागांमधील औषध फवारणी शेवटच्या टप्प्यात आहे.
बागायतदारांना दिलासा : भरघोस पिकाची शक्यता
४गेल्यावर्षी अवेळी पडलेला पाऊस तसेच अतिउष्णतेमुळे आंबा मोहराबरोबरच आंबा पिकावरही परिणाम झाला होता. तसेच थंडीचे प्रमाणही तितके चांगले नव्हते. आंबा पिकासाठी पोषक असलेले वातावरण व हवामान चांगले राहिल्यास जास्तीत जास्त आंबा पिक शेतकऱ्याच्या हाती येणार आहे. यामुळे वेंगुर्लेसह जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.