हागणदारीमुक्तीवर शिक्कामोर्तब
By admin | Published: August 3, 2016 12:38 AM2016-08-03T00:38:31+5:302016-08-03T00:38:31+5:30
कामकाजावरही समाधान : सावंतवाडीची राज्य समितीकडून पाहणी
सावंतवाडी : स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत हागणदारीमुक्त घोषित झालेल्या सावंतवाडी शहराची समितीच्या अधिकारी व सदस्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेला भेट देऊन पाहणी केली. हागणदारीमुक्ती घोषित झालेल्या शहरावर या समितीच्या पाहणीअंती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत सावंतवाडी शहर एक महिन्यापूर्वीच हागणदारीमुक्त घोषित केले होते. त्याच पार्श्वभूमीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची समिती मंगळवारी पहाटेच सावंतवाडी शहरात दाखल झाली. यामध्ये धुळे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय कदम, औरंगाबादचे प्रादेशिक उपायुक्त अलका खैरे, वरिष्ठ पत्रकार दत्ता सांगळे, समर्थ असोसिएशन पुणेचे दीपक बाचुलकर यांचा समावेश होता.
या समितीला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जिमखाना मैदान, उपरलकर स्मशानभूमी नजीकचा परिसर, कचरा डेपो, शहरातील वॉर्डमधील नाले परिसरासह संपूर्ण शहराची पाहणी करविली.
तसेच नगरपरिषदेच्या कामकाजाची माहिती दिली. पाहणीअंती परिषदेच्या कामकाजावर समाधान व्यक्त करीत सावंतवाडी शहराला हागणदारीमुक्त शहर असा शिक्कामोर्तब केला. दुपारी पाळणेकोंड धरणाची पाहणीही केली. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, नगरसेवक विलास जाधव, संजय पेडणेकर, देवा टेंबकर, गोविंद वाडकर, नगरसेविका कीर्ती बोंद्रे, अफरोज राजगुरु, शर्वरी धारगळकर, शुभांगी सुकी, क्षिप्रा सावंत, साक्षी कुडतरकर, वैशाली पटेकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
तोंडभरून कौतुक
४सावंतवाडी नगरपरिषदेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती राज्य समितीने घेतली. तसेच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांचे कौतुक केले. सावंतवाडी शहर आणि स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी घेतलेल्या मेहनतीचे समिती सदस्यांनी तोंडभरून कौतुक केले.