बसणीतील महिलांनी शेतीतून शोधली रोजगाराची संधी

By admin | Published: February 19, 2015 10:52 PM2015-02-19T22:52:53+5:302015-02-19T23:39:01+5:30

ग्रामीण बचत गटही आता पुढे... -आधारवड

Seasonal women search through farming opportunities | बसणीतील महिलांनी शेतीतून शोधली रोजगाराची संधी

बसणीतील महिलांनी शेतीतून शोधली रोजगाराची संधी

Next

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक महिला बचत गट आता स्वयंपूर्ण होऊ लागले आहेत. त्यामुळे बचत गटांची चळवळ जोमाने वाढू लागली आहे. महिला आता गृहिणीपद यशस्वीपणे सांभाळतानाच बचत गटाच्या कार्यात सहभागी होऊ लागल्या आहेत. आधुनिक पद्धतीने शेती करून त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीतून घरसंसार चालवू लागल्या आहेत. सकारात्मक प्रयत्नांमुळे त्या यशस्वी होऊ लागल्या आहेत. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढू लागल्याने आता वेगवेगळी आव्हाने स्वीकारण्याची मानसिकता त्यांच्यात निर्माण झाली आहे. असाच एक बचत गट म्हणजे रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील मंगलमूर्ती महिला बचत गट.

मंगलमूर्ती महिला बचत गट मेधा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आला. स्वत: जोशी यांच्यासह बचत गटाच्या अध्यक्षा आस्था धांगडे, विशाखा धांगडे, सुखदा धांगडे, रंजिता धांगडे, अंजली शिंदे, संपदा वारंग, सुजाता झगडे, वृषाली घाणेकर, शीला गोखले, स्मिता धांगडे अशा अकरा जणींचा हा गट आता चांगलाच तयार झाला आहे. स्थापनेनंतरच्या काही दिवसातच रत्नागिरीनजीकच्या शिरगाव येथे कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिलांनी या महोत्सवात जेवणाचा स्टॉल उभारला होता. विशेष म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही पद्धतीच्या या जेवणाला उत्तम प्रतिसाद लाभला. यामुळे एल. आय. सी., जिल्हा परिषदेची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि पंचायत समितीच्या कार्यक्रमावेळी या बचत गटाला जेवणाची आॅर्डर मिळाली.


रत्नागिरी तालुक्यात आता विविध संस्था, बँकांच्या सहकार्याने बचत गटांची चळवळ वाढीस लागली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिला पुढे येऊन बचत गटाच्या माध्यमातून उन्नतीचा मार्ग शोधू लागल्या आहेत. बसणीसारख्या ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन मंगलमूर्ती महिला बचत गटाची स्थापना केली. हा भाग ग्रामीण असला तरी रत्नागिरी शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असल्याने शहराशी येथील ग्रामस्थांचा वरचेवर संपर्क असतोच. शहरातील कार्यप्रणाली येथील लोकांना चांगलीच माहिती आहे. महिलावर्गालाही शहराची ओळख अतिशय चांगल्या तऱ्हेने झालेली आहे.
येथील महिलांचा बचत गट स्थापन करण्यात पुढाकार घेतला तो या गावातील मेधा जोशी यांनी. त्याआधी त्या १२९ बचत गटांना एकत्रित करणाऱ्या रत्नागिरीतील तेजस्विनी संस्थेचे काम करतात. ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून काम केले, तर त्यांचे काबाडकष्ट कमी होतील. त्यांच्या मुलांचेही राहणीमान सुधारेल, या हेतूने बसणीतील महिलांना एकत्र आणण्याचा प्रसत्न केला. सुरुवातीला कुणीच महिला यायला तयार नव्हतं. मात्र, जोशी यांच्या प्रयत्नाने महिला एकत्र आल्या आणि मेधा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली २०११ साली बसणीतील मंगलमूर्ती महिला बचत गटाची स्थापना झाली. यावेळी अध्यक्षपदी आस्था धांगडे यांची निवड करण्यात आली. या दोघींसह अन्य नऊ जणींचा मिळून हा बचत गट स्थापन झाला. मग मात्र, या महिला हुरूपाने बचत गटात कार्यरत झाल्या.
या महिलांनी विविध पापड, मसाले, पीठ, लाडू, चिवडा, शंकरपाळी आदी विविध खाद्यपदार्थ आदी वस्तू विविध ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनात ठेवण्यास सुरुवात केली. सुरूवातीपासूनच या मालाला चांगलाच उठाव मिळाला. रत्नागिरी शहरातील साई मंगल कार्यालय तसेच गणपतीपुळे येथे होणाऱ्या सरस प्रदर्शनात या बचत गटाने आपल्या वस्तुंचे स्टॉल्स उभारण्यास सुरूवात केली.
या प्रदर्शनातूनही त्यांच्या पदार्थांना चांगलीच पसंती मिळाली. आता तर या महिला स्वत:च ही पिके पिकवू लागल्या आहेत. उडीद, नाचणी, कुळीथ, कडवे आदी पिके घेऊन त्यापासून विविध पीठ तयार करून त्याची विक्री करू लागल्या आहेत. याचबरोबर कोकम आगळ, सरबत, उपासाची भाजणी, विविध सत्वे घरीच तयार करू लागल्या. त्यांच्या दर्जेदार वस्तूंमुळे ग्राहकांकडून या पदार्थांना चांगलाच प्रतिसाद मिळू लागला. व्यवसाय वाढवण्यासाठी या बचत गटाने सुरूवातीला आयसीआयसी बँकेकडून ७० हजार रूपयांचे कर्ज घेतले. ते अकरा महिन्यातच फेडल्याने बँकेने पुन्हा १ लाख ३० हजार रूपये कर्ज देऊ केले. यातून या बचत गटाने आपला मसाल्याचा व्यवसाय वाढवला. ओळख झाल्यामुळे त्यांच्या दर्जेदार मालालाही मागणी वाढली.
या बचत गटाचे विविध मसाले, पीठ आदी वस्तू तर मुंबई तसेच नजीकच्या नेरूळ येथील रेल्वेस्टेशनवरही विक्रीसाठी पाठवल्या जातात.
यातून आता या महिलांच्या हाती खेळते भांडवल वाढले आहे. या गावातील महिला बचत गट स्थापन करण्यासाठी पुढे येत नव्हत्या. पण, आता त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच आता त्या स्वतंत्ररित्या व्यवसाय करू लागल्या आहेत. बचत गटाच्या अध्यक्षा आस्था धांगडे यांनी तर आता या विविध व्यवसायाबरोबरच वडापावचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. विविध क्षेत्रात या महिला अपल्या कौशळ््याचा वापर करीत आहेत. त्याचबरोबर त्यांनी आता झेरॉक्स मशिन आणून तोही व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायात त्यांना यश मिळत आहे. इतरही महिला सदस्या विविध व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला हातभार लावीत आहेत.
- शोभना कांबळे

Web Title: Seasonal women search through farming opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.