शाळांचे दुसरे सत्र ठरणार धावपळीचे!
By admin | Published: November 22, 2015 09:56 PM2015-11-22T21:56:38+5:302015-11-23T00:30:00+5:30
विविध उपक्रम : दिवस कमी कार्यक्रम जास्त
टेंभ्ये : शाळांचे दुसरे सत्र सोमवारपासून सुरु होत आहे. परंतु, इ. १० वी व १२वीच्या परीक्षांना जेमतेम ८० ते ९० दिवस शिल्लक रहात असल्याने हे सत्र धावपळीचे ठरणार आहे. या सत्रामध्येच शाळांचे अनेक अभ्यासपूरक व अभ्यासेतर उपक्रम असतात. त्याचबरोबर १० वी, १२ वीच्या तोंडी परीक्षा, प्रकल्पकार्य या सर्वांमुळे शाळांची अवस्था ‘रात्र थोडी व सोंग फार’ अशी होणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०१४-१५चे दुसरे सत्र सोमवार दि. २३पासून सुरु होत आहे. यावर्षी दुसरे सत्र सुरु झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा करून सराव घेणे अपेक्षीत असते. विद्यार्थ्यांची परीक्षांच्या दृष्टीकोनातून तयारी करुन घेण्यासाठी हा कालावधी महत्वाचा मानला जातो.दुसऱ्या सत्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा महोत्सव भरवला जातो. यासाठी किमान ३ ते ५ दिवस लागतात.समाजसेवा शिबिरांचे आयोजन यादरम्यान केले जाते. अनेक शाळा डिसेंबर, जानेवारी महिन्यात वनराई बंधारे बांधतात. शाळांच्या शैक्षणिक सहलींचे आयोजनही डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यांच्या दरम्यान केले जाते. अनेक शाळांचे स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम दि. २६ जानेवारीला आयोजित केले जातात. या शैक्षणिक उपक्रमांबरोबरच या सत्रामध्ये दुसऱ्या सत्रातील पहिली घटक चाचणी व १० वी, १२ वीच्या पूर्व परीक्षा घेतल्या जातात. या सर्व शैक्षणिक उपक्रम व परीक्षांसाठी किमान २५ ते ३० दिवस लागतात. उर्वरित दिवसांमध्ये दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम व १० वी, १२ वीच्या तोंडी परीक्षा, प्रकल्पकार्य पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र इ. १०वी व १२वीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाते. या सत्रामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा कालावधी असल्याने प्रत्येक दिवसाचे शैक्षणिक मूल्य लक्षात घेऊन याचा वापर करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किरण लोहार यांनी केले आहे. (वार्ताहर)
बोर्ड परीक्षेच्या तयारीचा कालावधी - किरण लोहार
दुसरे सत्र म्हणजे विशेषत: इ. १०वी व इ. १२वी परीक्षेच्या अंतिम तयारीचा कालावधी मानला जातो. या कालावधीत संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी आवश्यक असते. या दरम्यान असणारे शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहेत. या शैक्षणिक वर्षात दुसरे सत्र लहान असल्याने शाळांना व शिक्षकांना काटेकोरपणे वेळेचे नियोजन करावे लागणार आहे. या सत्रातील इ. १० वी, १२ वीच्या दृष्टीने कामाच्या दिवसांची संख्या जेमतेम ८० ते ९० दिवस भरणार आहे. यावर्षी अधिक महिना आल्याने गणेशोत्सव, दीपावली हे सण जवळपास एक महिन्याने पुढे ढकलल्याने पहिले सत्र मोठे तर दुसरे सत्र जवळपास एक महिन्याने कमी झाले आहे. या सत्रामध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम शाळांमध्ये राबविले जातात.