Konkan Politics : उदय सामंत-फडणवीस यांच्यात रत्नागिरीत गुप्त भेट, निलेश राणे यांचा गौप्यस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 07:16 PM2021-05-25T19:16:13+5:302021-05-25T19:21:39+5:30
Konkan Politics : शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत नुकतीच गुप्त भेट घेतली. माजी खासदार निलेश राणे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतं. तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात राजकीय घडामोडी झाल्याचं आता समोर आलं आहे.
सिंधुदुर्ग :शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत नुकतीच गुप्त भेट घेतली. माजी खासदार निलेश राणे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतं. तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात राजकीय घडामोडी झाल्याचं आता समोर आलं आहे.
उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस रत्नागिरी दौऱ्याच्या आधीच शासकीय विश्रामगृहात पोहोचले होते.इतरांच्या भेटीगाठी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं कळतं. 21 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा होता. परंतु त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 20 मे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी उदय सामंत रत्नागिरीत पोहोचले होते. दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु आपल्यावर लक्ष ठेवा असं उदय सामंत फडणवीसांना म्हणाल्याचं कळतं.
निलेश राणे यांचा गौप्यस्फोट
माजी खासदार निलेश राणे यांनीच सामंत-फडणवीस भेट झाल्याचा गौप्यस्फोट केला. "तोक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही पालकमंत्री उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत गेले होते. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली," असा निलेश राणे यांनी सांगितलं.
ऑपरेशन लोटसची पुन्हा चर्चा
निलेश राणे यांच्या या दाव्यामुळे एकच चर्चा सुरु असून तोक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने भेट घेण्याचं नेमकं कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी सत्तेत आली. तेव्हापासूनच राज्यात ऑपरेशन लोटस सुरु होणार असल्याची चर्चा रंगू लागली. त्यामुळे ऑपरेशन लोटससाठी ही भेट झाली का अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात राजकीय भूकंप घडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.