गणेश चतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा महामार्ग सुरक्षीत करा, पत्रकार संघाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 04:19 PM2018-08-06T16:19:02+5:302018-08-06T16:26:38+5:30
भविष्यात खड्यांमुळे पुल कोसळून फार मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी मुुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीस सुरक्षीत करा, अशी मागणी कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने प्रांताधिकारी तथा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या सक्षम प्राधिकारी नीता सावंत-शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्याचबरोबर ब्रिटीश कालीन पुलांचे कोसळलेले कठडे व भलेमोेठे पडलेले खड्डे धोकादायक बनले आहेत.
भविष्यात खड्यांमुळे पुल कोसळून फार मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी मुुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीस सुरक्षीत करा, अशी मागणी कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने प्रांताधिकारी तथा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या सक्षम प्राधिकारी नीता सावंत-शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी निता सावंत-शिंदे यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे, उपाध्यक्ष अशोक करंबेळकर, तालुकाध्यक्ष भगवान लोके, सचिव नितीन सावंत, खजिनदार माणिक सावंत, माजी अध्यक्ष संतोष राऊळ, रमेश जोगळे, अजित सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेश सरकारे, मोहन पडवळ, सुधीर राणे, तुषार सावंत, स्वप्नील वरवडेकर, प्रदीप भोवड, संजय राणे, अनिकेत उचले, पंढरीनाथ गुरव, तुळशीदास कुडतरकर, संजय बाणे, भास्कर रासम आदींसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम करत असताना खारेपाटण ते ओसरगाव या ५७ किमीच्या कार्यक्षेत्रात अत्यंत धोकादायक खड्डे पडले आहेत. महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे, गडनदी पुल, जानवली पुल, बेळणे पुल, पियाळी पुल, कसाल पुल यासह अन्य पुलांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
या खड्यांमुळे दिवसेंदिवस ही ब्रिटीशकालीन पुले कमकुवत होत चालली आहेत. जीवघेण्या खड्यांमधून प्रवास करताना वाहनाची हानी व चालकांना, प्रवाशांना मान, मनका, कंबर दुखी यासारखे आजार जडत आहेत. या समस्येबाबत गणेश चतुर्थीपूर्वी तोडगा काढण्यासाठी संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी, काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे अधिकारी असा संयुक्त निरीक्षण दौरा करून या समस्येवर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी भगवान लोके यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली.
त्यावर प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी महामार्गाच्या दुरावस्थेबाबत येत्या कालावधीत दुरूस्तीसाठी संबंधित यंत्रणेला सूचना ताबडतोब करण्यात येतील़ तसेच संयुक्त पाहणी दौरा संबंधित यंत्रणेसोबत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी शिष्टमंडळातील ज्येष्ठ पत्रकारांनी महामार्गाच्या समस्यांबाबत अनेक ठिकाणी असलेल्या दुरावस्थेची परिपुर्ण माहिती प्रांताधिकाऱ्यांना दिली.