सुरक्षा चौकीदार मजुराच्या हाती
By admin | Published: April 7, 2015 10:49 PM2015-04-07T22:49:40+5:302015-04-08T00:29:35+5:30
तिलारी प्रकल्प : आठ महिने धरण अंधारात, तीन महिन्यांपासून रक्षकच नाही--लोकमत विशेष
अनंत जाधव - सावंतवाडी -देशातील प्रमुख धरण प्रकल्पाच्या सुरक्षेचे आॅडिट होत असतानाच गोवा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या तिलारी आंतरराज्य प्रकल्पाची सुरक्षा बेभरवशाची बनली आहे. ना धरणावर वीज, ना सुरक्षारक्षक अशी अवस्था आहे. आॅगस्ट २०१४ पासून धरणावरचा वीज पुरवठा खंडित आहे. तसेच निधीअभावी वीजबिल भरण्यात आले नाही. तीन महिन्यांपूर्वी धरणावरचे वीस सुरक्षारक्षकही कमी केल्याने धरणाची सुरक्षा कार्यालयातील चौकीदार व मजूर करत आहेत.
२६/११ ला मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर अतिरेक्याचे पुढील टार्गेट हे महाराष्ट्रातील मोठे पाटबंधारे प्रकल्प असल्याचे गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालात अनेक वेळा स्पष्ट केले आहे. त्यासाठी शासनाने राज्यातील मोठ्या प्रकल्पांना विशेष सुरक्षा पुरवण्याचे ठरवले होते. महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर असलेला तिलारी आंतरराज्य प्रकल्पही मोठा आहे. आतापर्यंत गोवा तसेच महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या विविध निधीतून या धरणावर १ हजार कोटी रूपये खर्च केले आहेत. १६ टीएमसीचा हा प्रकल्प आहे. १६ किलोमीटर या धरणाचे क्षेत्र असून या धरणाची साधारणत: रूंदी १ किलोमीटरच्या जवळपास आहे. या प्रकल्पातून गोव्याला ७८ टक्के पाणी पुरवठा होत असून महाराष्ट्राला २२ टक्के पाणी मिळत आहे. या धरणावर सर्वाधिक खर्च गोवा सरकारने केला आहे. मात्र, सध्या प्रकल्पाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. तिलारी प्रकल्पाला गेले वर्षभर निधी नाही. त्यातच अंतर्गत खर्च मिळेनासा झाल्याने तिलारी प्रकल्पाला विद्युत पुरवठा करणारे दोन विद्युत जनित्र खराब होऊन आठ महिने उलटली तरी ती बदलण्यात आली नाहीत. ही जनित्रे बदलण्यात न आल्याने तिलारी धरणावरचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तसेच विजेचे बिल भरण्यात आलेले नाही. साधारणत: नवीन जनित्रे बसवण्यासाठी ११ लाखाचा खर्च अपेक्षित असून कोनाळकट्टा येथील कार्यालयाने हा प्रस्ताव सप्टेंबर २०१४ मध्ये शासनाकडे पाठवून दिला आहे.
मात्र, याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने ही जनित्रे बसविण्यात आली नाहीत. त्यामुळे पूर्ण तिलारी धरण अंधारात आहे. तिलारी धरणाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा प्रकार ताजा असतानाच शासनाने धरणावर असलेले २० सुरक्षारक्षक कमी केले आहेत. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांचे काम तिलारी येथे कार्यरत असलेले चौकीदार व मजूर करीत आहेत. या चौकीदार व मजुरांकडे कार्यालयीन कामकाजाबरोबरच धरणाच्या सुरक्षेचे काम दिले आहे. आघाडी सरकार गेले आणि युती सरकार आले. मात्र, पाटबंधारे प्रकल्पाच्या चौकशीचा ससेमीरा काही संपत नसल्यानेच कोकणातील अनेक प्रकल्पांना निधी मिळणे दुरापास्त बनले आहे.
प्रस्ताव पाठविला
तिलारी प्रकल्पावरील विद्युत जनित्रे खराब झाली आहेत. त्यामुळे धरणावरचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्याला ११ लाखांचा निधी अपेक्षित असल्याचे शासनाला पत्राने कळविण्यात आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत आम्हाला निधी प्राप्त झाला नाही. तर शासनानेच धोरणाप्रमाणे सुरक्षा रक्षक कमी केले आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचारीच धरणाची देखभाल करीत आहेत.
- आर.बी.कुरणे, कार्यकारी अभियंता तिलारी पाटबंधारे
कामे थांबविली
गेले वर्षभर तिलारी प्रकल्पाला निधी आला नाही. त्यामुळे अनेक ठेकेदारांनी आपली कामे थांबवली आहेत. अधिकारी ठेकेदारांना मुदतवाढ देत आहेत. लोकप्रतिनिधींनी कोकणातील पाटबंधारे प्रकल्पाकडे पाठ फिरवल्याने आता पूर्ण होऊ घातलेले प्रकल्पही आता मागे पडत चालले आहेत. तिलारी प्रकल्प हा गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील मोठा प्रकल्प आहे. असे असताना त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे.