पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही हे पहा
By admin | Published: February 4, 2015 10:10 PM2015-02-04T22:10:12+5:302015-02-04T23:56:27+5:30
माधव गाडगीळ : वेंगुर्ले येथील कार्यक्रमात विकासनिधीवर विचारमंथन
वेंगुर्ले : पर्यावरण आणि विकासनीती याचा विचार करताना प्रथम विकास म्हणजे नेमके काय हवे, याचा विचार व्हायला हवा. विकासाच्या प्रक्रियेत औद्योगिकरणाला महत्त्व आहे. मात्र, पर्यावरणाचा ऱ्हास करून नव्हे. कोणताही प्रकल्प राबविताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. याकडे लक्ष पुरविले पाहिजे, असे मत ज्येष्ठ पर्याावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी वेंगुर्ले येथे व्यक्त केले. येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात रविवारी रात्री झालेल्या श्रीधर मराठे स्मृती ‘जागर विचारांचा’ या खास कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. गाडगीळ यांच्या व्याख्यानानंतर सिंधुदुर्गतील विविध भागांतून आलेल्या अनेकांनी प्रश्न विचारून विकासनिधीवर विचारमंथन केले. यावेळी दादा परूळेकर, अॅड. देवदत्त परूळेकर, विजय पालकर उपस्थित होते. डॉ. गाडगीळ म्हणाले, गाडगीळ अहवाल हा तंत्रशुद्ध निकषांवर खूप मेहनत घेऊन प्रत्यक्षदर्शी तयार केला आहे. अहवालात विकासाला अडसर होईल, अशी कोणतीही सूचना नाही. जनतेने या अहवालाचा अभ्यास करायला हवा. आपला देश सार्वभौम आहे. येथे लोकशाही आहे. त्यामुळे जनतेला काय हवे आणि काय नको, याचा विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. कायद्यांचे उल्लंघन होऊन विकास नको, असे ते म्हणाले. शेवटी पर्यावरणाचे संवर्धन हेसुद्धा महत्त्वाचे आहे. कारण पर्यावरण नष्ट झाले, तर त्यात माणसाचा ऱ्हासही निश्चित आहे. व्याख्यानानंतर झालेल्या खुल्या चर्चेत भरत आळवे, ओमकार तुळसुलकर, रविकिरण तोरसकर, पत्रकार महेंद्र पराडकर, हर्षद तुळपुळे, विजय रेडकर, समीर बागायतकर, जितेंद्र वजराटकर, प्रा. सुनील भिसे, प्रा. वामन गावडे, प्रा. राजाराम चौगुले, बाळू खामकर आदींसह अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. अॅड. देवदत्त परूळेकर यांनीही विचार मांडले. महेंद्र मातोंडकर यांनी सूत्रसंचालन, तर अॅड. शशांक मराठे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
गोव्यातील खाण व्यवसायात गैरव्यवहार
खाणबंदीमुळे गोव्याची अर्थव्यवस्था कोसळली, लाखो रुपयांचा रोजगार बुडाला, असे चित्र निर्माण केले जाते. प्रत्यक्षात मात्र गोव्यावर विपरित परिणाम झाला नसल्याचे निदर्शनास येते. अनेक लोक शेतीकडे वळले. पर्यटन व्यवसाय वाढला. येथील खाण व्यवसायात पस्तीस हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे ते म्हणाले.
रासायनिक उद्योगाचा विपरित परिणाम
रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे येथील रासायनिक उद्योगाचा पर्यावरण व त्या अनुषंगाने समाजावर विपरित परिणाम झाल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. या उद्योगामुळे काहींना रोजगार मिळाला, तरी दोन हजार उद्योग नष्ट झाले. वसिष्ठी नदी प्रदूषित झाली. मच्छिमारांपुढे तर जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले.
‘ठेवणीतला लोणचा’ चे प्रकाशन
गाडगीळ यांच्या व्याख्यानाआधी विजय पालकर यांच्या मालवणी भाषेतील ‘गजाली ठेवणीतला लोणचा’ व कथाकार अरुण सावळेकर यांच्या ‘ललितबंध’ या पुस्तकांचे प्रकाशन गाडगीळ यांच्या हस्ते झाले. श्वेता पालकर यांनी गजाली वाचून दाखविल्या त्यालाही रसिकांचा प्रतिसाद लाभला.
या पुस्तकातील रेखाचित्रे व मुखपृष्ठ साकारणाऱ्या कुडाळ येथील रजनीकांत कदम यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
राजकारण म्हणजे चिखल
४माधव गाडगीळ यांनी राजकारण म्हणजे चिखल आहे, या चिखलात आपल्याला पडायचे नाही, तो आपला प्रांत नाही, असे स्पष्ट केले.
४मालवण येथील प्रजत तोरसकर या छोट्या विद्यार्थ्याने गाडगीळ यांना तुम्ही पंतप्रधान झालात तर तुमचे पर्यावरण धोरण काय असेल, असा खोचक प्रश्न उपस्थित करून माधव गाडगीळ यांना बोलते केले.