कजोल गुरवची राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंगसाठी निवड

By admin | Published: December 23, 2014 09:59 PM2014-12-23T21:59:55+5:302014-12-23T23:50:26+5:30

राजापूरचा सन्मान : महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच सुवर्ण कामगिरी

Selection for Kajol Guravichi National Powerlifting | कजोल गुरवची राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंगसाठी निवड

कजोल गुरवची राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंगसाठी निवड

Next

राजापूर : मुंबई विद्यापीठअंतर्गत मुुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धा मुुंबई (मालाड) येथे पार पडल्या. या स्पर्धेत राजापूरची गोल्डन गर्ल कजोल हिने आबासाहेब मराठे विद्यालयाचे प्रतिनिधीत्व करत ५२ किलो वजनी गटात एकूण २९२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. महाविद्यालयाच्या इतिहासात पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
त्यानंतर लगेचच वेंगुर्ला येथे ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत कजोलने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत ५२ किलो वजनी गटात २९० किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. अवघ्या २.५ किलो वजनाच्या फरकाने कजोलचे सुवर्णपदक हुकले.
या कामगिरीमुळे तिची १ ते ३ जानेवारी दरम्यान पंजाब येथे होणाऱ्या आॅल इंडिया युनिर्व्हसिटी स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. तसेच ५ ते १० जानेवारी दरम्यान जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या संघातून आॅल इंडिया स्पर्धेसाठी कजोल पहिल्यांदाच आपले कसब पणाला लावणार आहे. ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत गतवर्षी हिमाचल प्रदेशमध्ये तिने चौथा क्रमांक पटकावला होता. त्यामुळे यावर्षी कजोलकडून राजापूरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यावर्षी मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा मानस आहे, असे कजोलने सांगितले.
कजोल सध्या एसवायबीएला आबासाहेब मराठे विद्यालयात शिकत आहेत. पॉवरलिफ्टिंगमध्ये आशियाई सुवर्णपदक विजेता खेळाडू प्रतीक गुरव याच्या मार्गदर्शनाखाली पॉवरलिफ्टिंग कसून सराव करीत आहे. वर्षभर केलेल्या प्रचंड मेहनतीचे फळ मिळत आहे आणि राष्ट्रीय स्पर्धेत कजोलकडून मोठी आशा आहे, असे प्रशिक्षक प्रतिक यांनी सांगितले.
राजापूर या तालुक्याच्या ठिकाणासारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडत आहेत. ही राजापूरकरांसाठी अभिमानाची बाब असल्यामुळे कजोलच्या या दुहेरी यशाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे. या यशाबद्दल वडील अशोक गुरव, आई अस्मिता गुरव, काका संजय गुरव, संपूर्ण कुटुंबीय, महाविद्यालयाचे प्राचार्य तपासे, क्रीडाशिक्षक भंडारी, शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच शिवशक्ती क्रीडा मंडळातर्फे तिचे जोरदार अभिनंदन करण्यात आले. तिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी कजोल २४ डिसेंबर रोजी रवाना होणार आहे. या निवडीबद्दल जिल्हाभरातून तिचे विशेष अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Selection for Kajol Guravichi National Powerlifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.