आत्मविश्वास, मेहनतीतूनच यश
By Admin | Published: August 13, 2016 09:04 PM2016-08-13T21:04:02+5:302016-08-14T00:23:51+5:30
अरविंद नांदे : मुळदेत ‘बी यूवर ओन बॉस’वर मागदर्शन, अनिल नेरूरकर यांचा उपक्रम
कुडाळ : सकारात्मक दृष्टिकोन, प्रचंड आत्मविश्वास आणि कठोर मेहनत करणाऱ्यांचाच व्यवसाय यशस्वी होऊन वृद्धींगत होतो. त्यासाठी सदैव उत्साही व कृतीपूर्ण जीवन अंगीकारावे, असे प्रतिपादन पुणे येथील सिंबॉयसिस युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर अरविंद नांदे यांनी केले. ते मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘बी यूवर ओन बॉस’ या कार्यक्रमात बोलत होते.
‘वसुंधरा सार्वजनिक विश्वस्त न्यास’ या संस्थेतर्फे जिल्ह्याचे सुपुत्र व अमेरिका येथील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. अनिल नेरुरकर विविध उपक्रम राबवितात. सिंधुदुर्ग जिल्हा तंबाखू मुक्त व्हावा, या हेतूने या जिल्ह्यात गेली अनेक वर्षे ‘तंबाखू प्रतिबंध अभियान’, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी नेरुरकर यांनी ‘यश गाठूया मोठे होऊया’, ‘बोलेल तो जिंकेल’, ‘इंग्रजी- संवाद कौशल्य’ या विषयांवर विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. याच अनुषंगाने शालेय मुलांसाठी उद्योगाची प्रेरणा व मिळण्यासाठी ‘बी यूवर ओन बॉस’ ही कार्यशाळा मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयात झाली. यावेळी डॉ. नेरुरकर प्रमुख व्याख्याते व प्रशिक्षक जागतिक कीर्तीचे मॅनेजमेंट गुरु व सिंबॉयसिस युनिव्हर्सिटीचे प्रो. अरविंद नांदे, महाविद्यालयाचे सहाय्यक अधिष्ठाता पराग हळदणकर, प्रा. एस. पी. माळी, नवीन राठोड, प्रसाद गावकर उपस्थित होते.
यावेळी नांदे म्हणाले, जे करायचे त्याची इर्षा पाहिजे. नकारात्मक दृष्टिकोन ठेवू नका. ज्ञान नाही, पैसा नाही म्हणून तुम्ही अपयशी होणार नाही. मात्र, इच्छा नसेल, खचून जाल त्यावेळी मात्र तुम्ही निश्चित अपयशी होणार. अपयशातूनही ज्ञान प्राप्त होते, अनुभव मिळतो.
डॉ. अनिल नेरुरकर म्हणाले, भारत कृषी प्रधान देश असून ४० कोटी लोक शेतीवर जगतात. मात्र, या कृषी प्रधान देशात केवळ ४० च्या आसपास कृषी विद्यापीठे व सुमारे १ लाख विद्यार्थी या विद्यापीठातून शिक्षण घेत असावेत, असे सांगत या कृषी विद्यापीठात तुम्ही कृषी विषयक शिक्षण घेत आहात ते योग्य असून या क्षेत्रात तुम्ही प्रगती साधावी. त्यातून यशस्वी व्हायला खूप सोपे असते. फक्त याकरिता पायाभूत ज्ञान गोळा करायलाच हवे. परिश्रम घ्यायला हवेत, संधी शोधल्या पाहिजेत, असे डॉ. नेरुरकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
चौकटीच्या बाहेर येऊन विचार करा : नेरुरकर
काहीजण नेहमीच एका चौकटीत वावरत असतात. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. त्यामुळे चौकटीच्या बाहेर येऊन विचार करा, स्वत:वर विश्वास ठेवा, उडी मारायला शिका, बदल करायला शिका, आशावादी बना, हसत हसत जगा व सकारात्मकता ठेवा. तरच पुढे जाल, असेही डॉ. नेरुरकर म्हणाले.
नेरुरकरांचे कार्य उल्लेखनीय : माळी
अमेरिका येथील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनिल नेरुरकर हे आपल्या मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी अमेरिकेहून या जिल्ह्यात विविध उपक्रम राबवितात. येथील विद्यार्थ्यांच्या व युवापिढीच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी कार्य खूप मोठे व कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राध्यापक माळी यांनी केले.