बचतगटांनी पुढाकार घ्यावा

By admin | Published: August 19, 2015 10:57 PM2015-08-19T22:57:46+5:302015-08-19T22:57:46+5:30

निला नायर : कालवा संवर्धन उपक्रमाबाबत वाडातर बैठकीत मार्गदर्शन

Self Help Groups should take the initiative | बचतगटांनी पुढाकार घ्यावा

बचतगटांनी पुढाकार घ्यावा

Next

देवगड : पश्चिम किनारपट्टीवर अशा प्रकारच्या कालवा संवर्धन अभिनव उपक्रमांची सुरूवातच पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिकांना चांगली उपजिविका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परदेशात याची विक्री करण्यासाठी खाडी पात्रात सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्याचा निचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी. या उपक्रमासाठी बचतगटातील महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत समुद्र उत्पादक व निर्यात विकास प्राधिकरण भारत सरकारच्या अध्यक्षा श्रीमती निला नायर यांनी व्यक्त केले.वाडातर येथील सुधीर जोशी यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच उल्का जोशी, मुख्य वनरक्षक कांदळवन कक्ष एन. वासूदेवन, समुद्र उत्पादक व निर्यात विकास प्रधीकरण भारत सरकारचे उपसंचालक अनिल कुमार, युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट डॉ. सुबिर घोष, रोहीत सावंत, वनक्षेत्रपाल एम. एस. शेळके, सोहेल जमादार, अन्वेश्वर भंगे, दुर्गा सावंत, दया पत्की, नाबार्ड उपव्यवस्थापक अ‍ॅनी अलेक्झेंडॉर, दाजी पवार, उमेश परब आदी उपस्थित होते.नायर यांनी महिला बचतगटाशी संवाद साधून हा उपक्रम कशा पद्धतीने राबवत असून त्याचा विविधतेचा अनेक प्रकारचा उलघडा करून याविषयी संपूर्ण माहिती घेतली व प्रसिद्ध महिला बचतगटाला याविषयक मार्गदर्शन केले. मच्छि वाळवून ती विकणे हा सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार महिलांचा पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व अनिर्बंध यांत्रिक मासेमारी यामुळे गेल्या ५-६ वर्षापासून कोकण किनारपट्टी क्षेत्रात कमालीचा मत्स्य दुष्काळ निर्माण झाला आहे. साहजिकच पारंपरिक मच्छिमारांसमोर रोजगाराचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर वाडातर येथील प्रसिद्धी महिला बचतगटाने कालवा संवर्धन प्रकल्प यशस्वी करून रोजगाराचा नवा व सुलभ मार्ग मच्छिमार महिलांना दाखवून दिला आहे.प्रसिध्दी महिला बचत गट यांच्याशी संवाद साधताना हा उपक्रम कशाप्रकारे यशस्वी केला याचा उलघडा त्यांनी केला. वाडातर येथील प्रसिद्धी महिला बचतगटाने कांदळवन कक्ष, मुंबई व युएनडीपी यांच्यामार्फत हा कालवा संवर्धन प्रकल्प तेथील खाडीत राबविला. केवळ १५ महिन्याच्या कालावधीत या प्रकल्पातून बचत गटाला दीड लाखांचे उत्पादन मिळाले. हा प्रकल्प राबविताना ३० बांबूचा मंडप खाडीत उभारण्यात आला. त्यानंतर एका रोपाला पाच पाच कालवांची रिकामी खरपे बांधून तळाला वाळू चूना लावलेले कौल बांधण्यात आले. असे ३०० ते ३५० रोप खाडीत उभारलेल्या बांबूच्या मंडपाला बांधण्यात आले. पंधरा महिन्यांच्या कालावधीत बांधण्यात आलेल्या खरप्यांना शेवाळ पकडणार नाही याची काळजी महिला बचतगटातील सदस्यांनी घेतली. पंधरा महिन्यानंतर खाडीतील बांबूच्या मंडपाला बांधलेले रोप बाहेर काढले असता एका एका रोपाला १० ते २५ कालवे धरली होती.
२५० ग्रॅम वजनाचे एक कालव होते. केवळ १६ हजाराच्या खर्चात या कालव संवर्धन प्रकल्पातून सहा हजार कालवे मिळाली. या कालवांना एका डझनला अडीचशे रूपये एवढा दर मिळाल्याने केवळ १६ हजाराच्या गुंतवणुकीतून बचतगटाला सव्वा लाखाचे विक्रमी उत्पन्न मिळाले.
पावसाळयात पाणी गोड झाल्याने कालवे निर्जीव होतात. त्यामुळे त्यांना चांगला दर मिळत नाही. मात्र आॅक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांमध्ये अंडी धरण्याच्या कालावधी असल्याने कालवांचे मिळणारे उत्पादन हे दर्जेदार असते. त्यामुळे या कालवांना चांगला दर मिळतो. पावसाळयात कालवांना डझनाला १५० रूपये दर मिळत असताना हाच दर आॅक्टोबरनंतर डझनाला ३०० ते ३५० रूपये मिळत असल्याचे महिला बचतगटाच्या अध्यक्षा कस्तुरी ढोके यांनी सांगितले.
प्रसिद्धी महिला बचतगटाच्या अध्यक्ष कस्तुरी ढोके, सायली फडके, भावना जुवाटकर, अनुष्का ढोके, प्रज्ञा ढोके, सायली वाडेकर, शुभदा जूवाटकर, संध्या पडेलकर, संजना भाबल, पार्वती जुवाटकर, दिपीका भाबल, सुलभा जावकर या
सदस्यांनी हा प्रकल्प यशस्वी केला आहे. (प्रतिनिधी)

दक्षता घ्यावी
आंतरराट्रीय बाजारपेठेत कालवा उपलब्ध झाल्यास त्यांना डझन मागे ३०० ते ४०० रूपये उत्पन्न मिळू शकते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविताना खाडीच्या नदीपात्रात अशुद्ध पाणी मिसळणार नाही याची दक्षता घेण्याचे गरजेचे असल्याचे सांगितले.

Web Title: Self Help Groups should take the initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.