विक्रेते तरले; बागायतदार हरले

By admin | Published: June 12, 2015 10:52 PM2015-06-12T22:52:36+5:302015-06-13T00:19:11+5:30

हवामानाचा फटका : यंदा झाले ७० टक्के पिकाचे नुकसान

Sellers liquid; The grappler loses | विक्रेते तरले; बागायतदार हरले

विक्रेते तरले; बागायतदार हरले

Next

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे यावर्षी हापूस आंबापीक धोक्यात आले. ७० टक्के पिकाचे नुकसान झाले. उत्पादन कमी झाले व दरही गडगडले. अवकाळीतून वाचलेला आंबा शेतकऱ्यांनी पावसापूर्वी काढण्याची घाई केली. त्याचा फायदा विक्रेत्यांना झाला. एकूणच यावर्षी ‘विके्रत्यांना तारले मात्र बागायतदार हरले’, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
नोव्हेंबरपासून थंडी सुरू झाल्याने यावर्षी नेहमीपेक्षा दोन आठवडे आंब्याचा हंगाम उशिरा सुरू झाला. त्यातच फेब्रुवारीच्या शेवटच्या व मार्चच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबापिक धोक्यात आले. जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबापिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, २० हजार ७१८.२० हेक्टर क्षेत्रावर पावसामुळे परिणाम झाला. फेब्रुवारी, मार्चमध्ये किरकोळ स्वरूपात असलेल्या आंब्याची एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बाजारपेठेत आवक वाढली. सुरुवातीला ३५०० ते ४५०० हजाराच्या घरात असलेला दर आवक वाढल्यानंतर गडगडला. एप्रिलमध्ये कँनिगला सुरूवात झाली. मात्र, एप्रिल, मे महिन्यात आलेल्या अवेळच्या पावसाचा फटका आंब्याला बसला. शिवाय तापमान वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला. मे महिन्यात आंब्याच्या दरात पुन्हा घसरण झाली. आंब्याचा दर ७० ते ८० रूपये डझन इतका खाली आला. स्थानिक मार्केटमध्येही आंब्याची आवक वाढली. त्याचदरम्यान कर्नाटक हापूस बाजारात दाखल झाला. ग्राहकांचा भूलभुलय्या करण्यात आला.
पावसापूर्वी आंबा काढून घेण्यात शेतकरी मग्न झाले. आंबा नाशिवंत फळ असल्याने ठेवण्यापेक्षा कॅनिंग घालणे वा मार्केटला मिळेल त्या भावाने विक्री सुरू ठेवली. मुंबई मार्केटमध्ये ८०० ते १२०० रूपये दर पेटीला उपलब्ध होता. मात्र मजुरी, पॅकिंग, वाहतूक, हमाली, दलाली आदी खर्च वजा जाता बागायतदारांच्या हातात अल्प किंमत शिल्लक राहिली. शेतकऱ्यांनी आंबा पिकासाठी गुंतवलेली रक्कमही वसूल न झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला.
यावर्षी युरोप, न्युझीलंड, अमेरिका, जपान तसेच आखाती प्रदेशातून आंब्याला मागणी होती. मुंबईतून आंबा निर्यात सुरू होती. मागणी असूनही उत्पादन अल्प असल्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होऊ शकलेला नाही. पुढील काळातही मागणी वाढतच जाणार आहे मात्र हवामानाची साथ हवी. गतवर्षी कोकणातून ६५ ते ७० लाख पेट्या मुंबई मार्केटमध्ये पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, यावर्षी जेमतेम १५ लाख आंबा पेट्या विक्रीस आल्या असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी दिली.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा फारच कमी होता, असेही त्यांनी सांगितले. रत्नागिरी हापूस सुरू असतानाच कर्नाटकमधून आंबा पाठवण्यात आला. सुरूवातीला २९ रूपये कॅनिंगचा असलेला दर १८ रूपयांपर्यंत खाली आला. पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी घाई केली. १५ ते २० मे पूर्वीच ७० टक्के शेतकऱ्यांनी पीक काढणी पूर्ण केली. (प्रतिनिधी)

आंब्याची आवक मोठी
तापमानातील बदलामुळे आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी वाशी मार्केटबरोबर पुणे, कोल्हापूर, अहमदाबाद मार्केटचा आधार घेतला. किरकोळ विक्रीबरोबर खासगी विक्री सुरू ठेवली. मात्र, यामध्ये शेतकऱ्यांनी धोका पत्करून स्वबळावर विक्री केली. खासगी विक्रीमध्ये चार पैसे मिळवण्यासाठी दर्जादेखील कायम ठेवावा लागतो. मोठी उलाढाल असलेल्या शेतकऱ्यांना ते शक्य होत नाही. त्यामुळे प्रतवारीनुसार दररोज मार्केटला आंबा पाठवावाच लागतो. पावसामुळे शेतकऱ्यांनी घाई केली. मान्सूनपूर्व पाऊस या नैसर्गिक कारणांबरोबरच काढणीदरम्यान शेतकऱ्यांना मजुरांची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडासावत होती. त्यामुळेही शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रूपये नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली असून, हेक्टरी २५ हजार रूपयेप्रमाणे नुकसान भरपाईचे वितरण केले जाणार आहे.

Web Title: Sellers liquid; The grappler loses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.