‘नाणार’विरोधात सेनेची संघर्ष यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:54 PM2018-07-08T22:54:42+5:302018-07-08T22:55:22+5:30

Sena's struggle against 'NARAAN' | ‘नाणार’विरोधात सेनेची संघर्ष यात्रा

‘नाणार’विरोधात सेनेची संघर्ष यात्रा

Next


राजापूर : स्थानिकांचा विरोध असतानादेखील केंद्र्र व राज्य शासनाने रिफायनरी प्रकल्प लादण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली डोंगर तिठा ते चौके यादरम्यान काढण्यात आलेल्या ‘चलेजाव संघर्ष यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मुसळधार पाऊस कोसळत असतानादेखील त्याची पर्वा न करता मोर्चा पार पडला. केंद्र्र व राज्य शासनाच्या विरोधात बुलंद घोषणांनी प्रकल्प परिसर दणाणून गेला. मोर्चा समाप्त होताच खासदार विनायक राऊत यांच्यासह सेनेच्या नेत्यांनी केंद्र्र व राज्य शासनाविरोधात टीकेची झोड उठविताना हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी शासनाला ठणकावले.
नाणार परिसरातील १४ गावांतील जनतेचा १०० टक्के विरोध असतानादेखील विद्यमान केंद्र्र व राज्य सरकारने नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्प लादला असून, शिवसेनेने त्याविरोधात मागील काही महिन्यांत जोरदार विरोध केला आहे. शासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली रिफायनरी प्रकल्पासह सौदी अरेबियाची अरांम्को व आबुधाबीच्या अ‍ॅडनॉक कंपनीला चले जाव करण्यासाठी संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी सकाळी डोंगर तिठा ते चौके अशी सुमारे चार कि.मी. पायी यात्रा काढण्यात आली. या यात्रेत खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र्र महाडिक, सेनेचे उपनेते आमदार उदय सामंत, संघर्ष समितीचे सचिव भाई सामंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेनेचे मुंबईतील पदाधिकारीही सहभागी झाले होते. स्थानिक प्रकल्पग्रस्तांचाही मोठा सहभाग होता.
डोंगर तिठा ते चौके असा प्रवास झाल्यावर चौके येथे त्या यात्रेचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी केंद्र्र व राज्य शासनाचा चांगलाच समाचार घेण्यात आला. एकीकडे मुख्यमंत्री हा प्रकल्प लादणार नाही, जनतेशी चर्चा करू, असे सांगतात; पण ते नाणारला येऊन येथील जनतेला का भेटत नाहीत, असा खडा सवाल खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला.
कोकणात बळजबरीने लादलेला हा रिफायनरी प्रकल्प जोवर शासन रद्द करणार नाही, तोवर आमचा लढा असाच चालू राहील, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला. स्थानिक संघर्ष समितीच्यावतीने त्यांचे नेते भाई सामंत यांनीही रिफायनरीवरून शासनाचा समाचार घेतला.
पुढील टप्प्यात गावापासून रत्नागिरीपर्यंत यात्रा
जनतेचा विरोध डावलून प्रकल्प लादल्यामुळे शिवसेनेने शासनाविरोधात सुरू केलेली पहिली ‘चलेजाव संघर्ष यात्रा’ डोंगर तिठा ते चौके अशी पार पडली. पुढील टप्प्यात ती प्रकल्पग्रस्त गावांमधून रत्नागिरी अशी काढली जाणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्यावतीने देण्यात आली.
राजपुत्र नको, भूमिपुत्र हवेत
आम्हाला राजपुत्र नको, तर भूमिपुत्र हवे आहेत, अशा शब्दांत त्यांनी शासनाला फटकारले, तर सिडकोच्या जमीन विक्री व्यवहारप्रकरणी शासनाने जसे चौकशीचे आदेश दिले, तशाच प्रकारे नाणारमधील परप्रांतीयांकडून झालेल्या सर्व जमिनींच्या खरेदीच्या व्यवहारांचीही चौकशी हे राज्य शासन का करीत नाही? असा खडा सवाल शिवसेना उपनेते व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी उपस्थित केला.

Web Title: Sena's struggle against 'NARAAN'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.